Akola : कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी लढा उभारणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आता अकोला जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार मोर्चेबांधणीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत अडीच लाखांवर मतदान घेणारे शेतकरी रविकांत तुपकर यांनीही विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर हे नेहमी आक्रमकपणे आंदोलन करीत असतात. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात करण्यात आलेल्या आंदोलनानंतर आता तुपकर यांनी आपला ‘मोर्चा’ अकोला जिल्ह्याकडे वळविला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून रविकांत तुपकर यांना काढण्यात आले होते. त्यामुळे तुपकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ‘महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडी’ची घोषणा केली होती. या आघाडीच्या वतीने विधानसभेच्या 25 जागा लढविणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे आता पुढील राजकीय मोर्चेबांधणीला तुपकरांकडून जोरदार सुरूवात करण्यात आली आहे.
आता मूर्तिजापूरात आंदोलन!
रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने मूर्तिजापूर शहरात दहिहांडी आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. कोणत्याही अटी शर्ती न लावता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती देण्यात यावी. मुर्तिजापूर-बार्शिटाकळी तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहिर करुन हेक्टरी 50,000 रु. तात्काळ मदत द्यावी. एच.डी.एफ.सी. पिक विमा इन्शुरन्स कंपनीने 2023 मध्ये खरीप व 2024 रब्बी चे सर्व क्लेम मंजुर करुन ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे केले नाही. अशा शेतकऱ्यांना पात्र धरुन तात्काळ मदत द्यावी. ई-पीक पाहणीची अट रद्द करावी. 2023 मध्ये ज्या शेतकऱ्यांच्या 7/12 वर ई-पीक ची नोंद नाही आहे अशा सर्व शेतकऱ्यांचा 2021 व 2022 चा पिक पेरा ग्राह्य धरावा.
सोयाबीन व कापुस उत्पादक शेतकऱ्यांना जी हेक्टरी 5,000 रु. मदत मिळणार आहे ती द्यावी. मुर्तिजापूर-वार्शिटाकळी तालुक्यामधील शेतकऱ्यांना शेतीसाठी 24 तास विज उपलब्ध करुन द्यावी. शेतकऱ्यांनी शेतीच्या विज कनेक्शन करीता अर्ज केलेले आहे त्यांना विज जोडणी द्यावी. तसेच जे विद्युत रोहित्र नादुरुस्त आहेत ते ताबडतोब दुरुस्त करुन देण्यात यावे. सोयाबीनला 7000 रु. व कापसाला 12000 रु. प्रति क्विंटल भाव बाजार समितीमध्ये स्थिर करण्यात यावा. वन्य प्राण्यापासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी 90% अनुदानावर कंपाऊंडसाठी तार देण्यात यावे. आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
‘त्या’ 25 जागांमध्ये अकोल्यातील मतदारसंघ!
काही दिवसांपूर्वी पुणे येथे कार्यकर्त्यांची बैठक घेऊन रविकांत तुपकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ‘महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडी’ची घोषणा केली होती. या आघाडीच्या वतीने विधानसभेच्या 25 जागा लढविणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. या 25 जागांपैकी अकोला जिल्ह्यातील काही मतदारसंघावर तुपकरांनी लक्ष केंद्रित केलं असल्याची माहिती आहे. त्यामध्ये मूर्तिजापूर आणि अकोला पूर्व या मतदारसंघाचा समावेश आहे. सध्या पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन आक्रमकपणे आंदोलन करणारे रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांच्या जवळ गेले आहेत.