Demand Before Election : गेल्या काही दिवसांपासून राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं आहे. मराठा, ओबीसी, धनगर आणि आता अदिवासी समाजाकडून आंदोलन करण्यात येत आहे. धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या आरक्षण देऊ नये, या प्रमुख मागणीसाठी अकोल्यात 30 सप्टेंबर रोजी रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी अकोल्यातल्या राष्ट्रीय महामार्ग आणि अकोला हैदराबाद महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. शेकडो आदिवासी बांधव या आंदोलनात सहभागी झालेत.
धनगर समाज आक्रमक
मराठा आरक्षणावरून सरकार अडकित्त्यात सापडलेले आहे. असे असतानाच आता धनगर समाज आक्रमक झाला आहे. धनगर समाजाला अनुसूचित जाती (ST) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलन सुरू करण्यात आले आहे. धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण देण्यात येऊ नये, अशी मागणी आता आदिवासी समाजाकडून केली जात आहे.
अनेक मुद्दे चर्चेत
‘पेसा’भरती आणि धनगर समाजाची आदिवासी समाजाच्या आरक्षणात घुसखोरी थांबवावी या मागण्यांसाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आदिवासी आमदार यावर आक्रमक झाले आहेत. बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. नाशिक, मुंबईमध्ये (Mumbai) हे आंदोलन करण्यात येत आहे. त्यानंतर आता राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठा आणि ओबीसी आंदोलनापाठोपाठ सत्ताधारी पक्षाच्या आदिवासी आमदारांचे आंदोलन महायुती (Mahayuti) सरकारची डोकेदुखी वाढवणार असल्याचे चित्र आहे.
Dhangar Reservations : हक्काच्या आरक्षणात ढवळाढवळ चालणार नाही !
रास्ता रोको आंदोलन
अकोल्यात आदिवासी समाजाने ठिकठिकाणी रास्ता रोको करीत सरकारचा निषेध केला. अकोल्यातल्या राष्ट्रीय महामार्ग अडविण्यात आला. अकोला हैदराबाद महामार्गावरही रास्ता रोको करण्यात आला. धनगर समाजाला आदिवासींच्या आरक्षणातून आरक्षण हवे आहे. मात्र, त्याला आदिवासी समाजाचा विरोध होत आहे. त्यामुळे दोन्ही समाज आंदोलनात रस्त्यावर उतरले आहेत. धनगर समाजाने आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन केले होते. आता आदिवासी समाजाने देखील धनगर समाजाच्या आरक्षणावरून रास्ता रोको केला आहे. या आंदोलनात आदिवासी समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. अकोल्यात दोन ठिकाणी रास्ता रोको झाल्याचे पोलिसांची धावाधाव झाली. अकोला नागपूर आणि अकोला हैदराबाद महामार्ग यामुळे ठप्प झाला. तब्बल 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ वाहतूक बंद होती.