Badlapur Case : बदलापूर येथे बालिकांवर झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर राज्यभरात आंदोलन सुरू झाले आहे. पोलिसांनी तपासात दिरंगाई केल्याचा ठपका गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठेवण्यात येत आहे. महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांकडून देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. अशात युवक काँग्रेसने फडणवीस यांच्या नागपूर येथील देवगिरी बंगल्याबाहेर जोरदार निदर्शने केली. फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसने दिला होता. त्यानंतर सिव्हिल लाइन्स आणि धरमपेठ भागातील त्रिकोणी पार्क परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
इशारा दिल्याप्रमाणे गुरुवारी (ता. 22) दुपारच्या सुमारास युवक काँग्रेसचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत देवगिरी परिसरात पोहोचले. सरकार आणि गृहमंत्र्यांविरोधात प्रचंड घोषणाबाजी करत आंदोलकांनी फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. बराच वेळपर्यंत ही घोषणाबाजी सुरू होती. त्यानंतर नागपूर पोलिसांनी अतिरिक्त ताफा मागवत आंदोलकांना ताब्यात घेतले. लवकरच महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे. अशातच बदलापूर नंतर एका पाठोपाठ अत्याचाराच्या घटना उघडकीस येत आहेत.
कोलकाता घटनेनंतर संताप
कोलकाता येथील महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्काराची घटना ताजी आहे. देशभरात या घटनेनंतर संतापाची लाट आहे. अशातच बदलापूर येथील बलात्कार प्रकरण उघडकीस आले. ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेच्या व्यवस्थापनाचे सत्ताधारी पक्षाशी कनेक्शन आहे. त्यामुळे बदलापूर प्रकरणावरून राजकारण करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. बदलापूरच्या घटनेनंतर अकोल्यात ही एका शिक्षकांनी बालिकांचे शोषण केल्याचे घटना उघडकीस आली आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्येही एका अल्पवयीन तरुणीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला आहे. मात्र केवळ बदलापूर प्रकरणावरून सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि आंदोलन सुरू आहे. अशातच काँग्रेसने केलेल्या आंदोलनामुळे नागपुरात पोलिसांची चांगली धावपळ झाली.
काँग्रेसने दिलेल्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी फडणवीस यांच्या दोन्ही घराबाहेर बंदोबस्त तैनात केला. आता हे आंदोलन संपले आहे. त्यानंतरही फडणवीस यांच्या घराबाहेरील पोलिस बंदोबस्त कायम राहणार आहे. महाविकास आघाडीमध्ये असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अशा कोणत्याही आंदोलनाचा इशारा दिलेला नाही. मात्र पोलिसांना या संदर्भात कोणतीही जोखीम पत्करायची नसल्याने बंदोबस्त कायम ठेवण्यात येणार आहे. काँग्रेससह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवरही सध्या पोलिस पाळत ठेवून आहेत. राजकीय आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची खबरदारी पोलिस घेत आहेत.