Akola Politics : आम आदमी पार्टीचे संस्थापक, राष्ट्रीय संयोजक.तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने बेकायदेशीर अटक केल्याचा आरोप ‘आप’ने केला आहे. या अटकेच्या निषेधार्थ अकोल्यात इंडिया आघाडीच्यावतीने नवीन बस स्टॅन्ड समोरील मदनलाल धिंग्रा चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.
ईडी या स्वायत्त संस्थेचा भाजपच्यावतीने घरगडी सारखा वापर होत आहे. देशातील सत्तेच्या विरोधात असलेल्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना बेकायदेशीर अटक करून दडपशाही केली जात आहे. यामुळे देशभारत भाजपा विरोधी वातावरण तया होत आहे. त्यातच ‘आप’ इंडिया आघाडीत कार्यरत झाल्याने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे चिडून जात ईडीमार्फत भाजपा कारवाई करीत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना यातूनच अटक केल्याच्या आरोप करीत आम आदमी पार्टी व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. आम आदमी पार्टीचे जिल्हा संयोजक कैलास प्रांजळे, महानगर संयोजक हाजी मसूद अहमद, ज्ञानेश्वर साकरकार, प्रदिप गवई, संदीप जोशी, दर्पण खंडेलवाल, आकिब खान, अरविंद कांबळे, विजय चक्रे, काजी लियाकतअली, संतोष दाभाडे, सागर प्रांजळे यांच्यासह काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, महानगर अध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे, साजिद खान पठाण आदी आंदोलनात सहभागी झालेत.
काँग्रेसने दिले निवेदन
लोकसभा निवडणूक 2024 जाहीर झालेली आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला निवडणूक रोखे, जे सुप्रीम कोर्टाने बेकायदेशिर ठरवून बंद केले आहे, त्याद्वारे हजारो कोटी रुपये मिळाले आहेत. असंवैधानिक मार्गाने मिळालेले पैसे भारतीय जनता पार्टीकडून तत्काळ जप्त करण्यात यावे. काँग्रेस पक्षाचे सर्व बँक खाते त्वरीत सुरू करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. एका खासगी कंपनीद्वारे मोदीजींचा प्रचार करण्यात आल्याने कारवाई करण्यात यावी अशी मागणीही काँग्रेसने केली आहे. निवडणूक काळात जाहिरात झाल्याने झालेला खर्च भारतीय जनता पार्टी व त्यांच्या मित्र पक्षांच्या खात्यावर लावण्यात यावा, असेही काँग्रेसने नमूद केले आहे.