महाराष्ट्र

Raksha Khadse : ही दोस्ती तुटायची नाय…

Pritam Munde : प्रीतम मुंडेंच्या भावनिक पोस्टनंतर रक्षा खडसेंचे उत्तर 

Beed : बीडच्या माजी खासदार प्रीतम मुंडे यांनी जळगाव जिल्ह्यातील रावेरच्या भाजप खासदार रक्षा खडसे यांच्यासाठी नुकतीच भावनिक पोस्ट केली आहे. मागील 10 वर्षांमध्ये संसदेत रक्षा खडसे आणि प्रीतम मुंडे एकत्रच होत्या. त्यावेळी त्यांची मैत्री घट्ट झाली, असं त्या म्हणाल्या. दरम्यान आमची मैत्री ही राजकारणापलीकडची आहे. म्हणून ‘ही दोस्ती तुटायची नाय…!’ अश्या शब्दांत रक्षा खडसेंनी प्रीतम मुंडेंच्या पोस्टला उत्तर दिले.

सोमवारी (ता. १७) शेगावात रक्षा खडसे माध्यमांशी बोलत होत्या. २०१४ ते २०२४ पर्यंत लोकसभेत एकाच बाकावर बसणाऱ्या बीडच्या डॉ. प्रितम मुंडे आणि रक्षा खडसे यांची लोकसभेतली मैत्री आता तुटली आहे. त्याचं कारण प्रितम मुंडेंना पक्षाने तिकिट नाकारलं. त्यांच्याऐवजी पंकजा मुंडेंना तिकीट दिलं होतं. परंतु पंकजांचा बीड लोकसभा निवडणुकीत पराभव झाला.

दुसरीकडे रक्षा खडसे ह्या मात्र तिसऱ्यांदा खासदार झाल्या. त्यामुळे पक्षाने त्यांना केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री म्हणून कम करण्याची संधी दिली आहे. रक्षा खडसेंना मंत्रिपदाची संधी मिळाल्यानंतर त्यांची जीवलग मैत्रीण माजी खासदार प्रितम मुंडे यांनी एक भावनिक पोस्ट शेअर करत रक्षा खडसेंना शुभेच्छा दिल्या. आपली मैत्री दृष्ट लागण्यासारखी होती, असं म्हणत दोघींनी सोबत घालवलेल्या क्षणांची आठवण मुंडेंनी करुन दिली आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत रावेरमधून रक्षा खडसे यांनी शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. रक्षा खडसेंना आता केंद्रीय मंत्रिमंडळात स्थानही मिळाले. मागील 10 वर्षांमध्ये संसदेत रक्षा खडसे आणि प्रीतम मुंडे एकत्रच होत्या. त्यावेळी त्यांची मैत्री घट्ट झाली होती. केंद्रात मंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतरही रक्षा खडसे यांनी प्रीतम मुंडे यांची आठवण काढली होती. आता प्रीतम मुंडे यांनीही रक्षा खडसे यांच्यासाठी खास पोस्ट केली आहे. या पोस्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

Vidhan Sabha Election : कुणाला मिळणार मंत्रीपद, कुणाला डच्चू ?

केंद्रीय मंत्री झाल्यानंतर सोमवारी रक्षा खडसे यांनी पहिल्यांदाच संत नगरी शेगावमध्ये पोहोचून श्री संत गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विश्राम भावनाबाहेर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी डॉ. प्रीतम मुंडे यांच्या पोस्ट बाबत छेडले असता खडसे म्हणाल्या की, आमची मैत्री ही राजकारणापलीकडची आहे. त्यामुळे ती तुटायची नाय, असं त्या म्हणाल्या.

एकाच बाकावर बसायच्या..

गेली 10 वर्ष खूप काही देऊन गेली , बहुतेक चांगलंच. मंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतर जल्लोष साजरा करण्यापेक्षा आपली मैत्रीण संसदेत नाही म्हणून गहिवरून येणारी तू ! रक्षा;आजच्या एवढ्या स्वार्थी जगात आपली मैत्री दृष्ट लागण्यासारखीच आहे. पक्षातील निवडणूक निरीक्षकांना एकमेकांच्या शिफारसी करणाऱ्या, स्वतःच तिकीट जाहीर झालं की नाही यापेक्षा मैत्रिणीचं तर झालं न हे बघणाऱ्या, निकालाच्या दिवशी स्वतःचे उतार चढाव हाताळतानादेखील एक नजर कायम दुसरीच्या निकालाकडे ठेवणाऱ्या. १० वर्षे सतत संसदेत शेजारी बसणाऱ्या. पक्षाच्या बैठकांना एकत्रच जाणाऱ्या. दिल्लीत एकाच मजल्यावर राहणाऱ्या. एकमेकींना राजकीय घटनांपासून कपड्यांच्या रंगसंगतींपर्यंत सल्ले देणाऱ्या आपण. संसदेतील विधेयकांची चर्चा करणाऱ्या आपण, अनेक देवदर्शनांना देखील एकत्रच गेलो.

10 वर्षातला प्रवास तुमच्या सगळ्यांच्याच सोबतीने खूप छान झाला, पण तुझं स्थान माझ्या आयुष्यात खास होतं आणि नेहमी राहील. आजच्या या स्वार्थी जगात निस्वार्थ मैत्री जपणारी माझी मैत्रीण रक्षा तुला या यशाच्या कोटी कोटी शुभेच्छा. तुझ्या हातून आजपर्यंत घडलं तसंच चांगलं कार्य घडत राहो. सतत लोकसेवा तुझ्या हातून घडत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना..

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!