Chandrapur Constituency : काँग्रेस नेत्यांची अवस्था आज काय आहे, अत्यंत वाईट आणि यासाठीही ते स्वतःच जबाबदार आहेत. कारण सत्तेत असताना त्यांनी फक्त भ्रष्टाचार केला. मोदीवर टिका करण्यातच ते धन्यता मानतात. पण मी शाही घराण्यात जन्म घेऊन पंतप्रधान नाही झालो, तर एका सामान्य कुटुंबात जन्म घेतला. परिस्थितीच चटकेही भोगले. म्हणून मला गरीबांचीही परिस्थिती माहिती आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जोरदार टोले लगावले.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ आज (ता. ८) चंद्रपुरात मोदींची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मोदी म्हणाले, महाराष्ट्राच्या विकासाचा एकही प्रकल्प काँग्रेसचे सरकार देत नव्हते. कमिशन द्या नाहीतर काम थांबवा, हेच त्यांचे धोरण होते. येथे नवीन विमानतळाचा विषय आला, तेव्हाही कमिशनसाठीच प्रकल्प थांबवला. त्यांनी महाराष्ट्राच्या हिताची जलयुक्त शिवार योजना बंद केली.
विदर्भाच्या विकासासाठी मी ज्या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले, त्या समृद्धी महामार्गालाही काँग्रेस नेत्यांनी विरोध केला होता. मुंबई मेट्रोचेही काम थांबवले होते. त्यांचे ध्येय कमिशन घेण्याचेच होते. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सरकार दिवसरात्र काम करत आहे. विकासाची कामे होत आहेत. नियत साफ असली की परिणामही चांगले होतात, हेच मोदी सरकारने तमाम देशवासीयांना दाखवून दिले आहे.
आज सर्व जण मोदी सरकारला आपले सरकार मानतात, हेच आपले यश आहे. मोदी शाही परिवारात जन्म घेऊन पंतप्रधान नाही बनला, तर सामान्य घरात जन्म घेऊन येथपर्यंत आला आहे. ज्यांच्याकडे घरे नव्हती, त्यामध्ये दलित, आदिवासी, वंचित लोकांचीच संख्या जास्त होती. ज्यांच्या वस्तीत पिण्याचे पाणी, वीज, रस्ते काहीच नव्हते. या समाजातील मुलांना शिक्षणाअभावी राहावे लागत होते. पण मोदीने गॅरंटी दिली होती. दलित, आदिवासींचे जीवन बदलवण्याची गॅरंटी दिली होती. त्यासाठी निरंतर मेहनत केली, असे मोदींनी सांगितले.