Chandrapur Constituency : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि गडचिरोलीचे अशोक नेते यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आज (ता. 8) चंद्रपुरात पार पडली. या सभेत सुधीर मुनगंटीवार यांनी गेली ३० वर्ष आमदार आणि मंत्री म्हणून महाराष्ट्रात केलेल्या कामांचा मोदींनी गौरव केला. सुधीरजी मेरे पुराने मित्र है…, असे म्हणत मुनगंटीवार यांना संसदेत पाठवण्याचे आवाहन जनतेला केले. यावेळी चंद्रपूरकरांची छाती अभिमानाने फुलून गेली.
मोदी म्हणाले, गेल्या १० वर्षाच्या आमच्या सत्तेत ४ कोटी लोकांना पीएम आवासाअंतर्गत घरं मिळाले. १० कोटीपेक्षा जास्त परिवारांना मोफत सिलिंडर दिले, ते जास्ती जास्त दलित आणि आदिवासी वर्गातील लोक आहेत. शौचालय बनवले. मोफत धान्य देत आहोत. यामध्येही दलित, आदिवासींची संख्या लक्षणीय आहे. केंद्र सरकारच्या योजनांमुळे देशातील जनतेच्या जीवनात काय बदल झाले, हे मोदींनी सांगितले.
हे तुमचे श्रेय..
जिथपर्यंत नजर पोहोचत आहे, तिथपर्यंत लोकच लोक दिसत आहेत. आज ५० कोटी पेक्षा जास्त लोकांना ५ लाख रुपयांचे मोफत उपचार मिळत आहेत. लहान शेतकरी सन्मानाचे जीवन जगत आहेत. याचे श्रेय कुणाला जाते, तर हे सर्व तुमच्या एका मताच्या शक्तीने केले आहे. या पुण्यकार्याचे आपणही तेवढेच हकदार आहेत. राजकीय पक्षांचे कर्तव्य असते की जनतेचे समाधान करणे. पण काँग्रेस पक्ष स्वतःच समस्यांचे माहेरघर आहे. त्यामुळे त्यांच्याकडून जास्त अपेक्षा करता येत नाही.
काँग्रेस आतंकवाद्यांना संरक्षण देत होती..
स्वातंत्र्यानंतर देशाचे विभाजन झाले. ते कुणी केले? आझाद होताच काश्मीरमध्ये काँग्रेसने समस्या उभ्या केल्या. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शेजारी देशांची प्रगती झाली. पण तुलनेत आपला देश मागे राहिला. आतंकवाद्यांना काँग्रेस संरक्षण देत होती. नक्षलवादाची समस्या गंभीर झाली होती. लाल आतंक काँग्रेसचीच देन होती. राम मंदिराचा ५०० वर्ष जुना विवाद तसाच होता. तो काँग्रेसनेच ठेवला होता. काँग्रेसनेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न मिळू नाही दिला, असे म्हणत मोदींनी काँग्रेसवर चांगलाच हल्ला चढवला.
१० वर्षापासून काँग्रेस सत्तेच्या बाहेर आहे. तेव्हापासून आम्ही मोठमोठ्या समस्यांचे परमनंट इलाज केले. महाराष्ट्रच नाही तर पूर्ण देशात नक्षलवाद कमजोर पडला आहे. जो गडचिरोली जिल्हा नक्षलवादी म्हणून ओळखला जात होता, तो विकास आणि स्टील इंडस्ट्रीजसाठी ओळखला जातो. त्यांच्याच कर्तृत्वाने समर्थन हटले. आता ते ‘फोडो और राज करो’, वर आले. घोषणापत्रातही मुस्लीम लीगची भाषा लिहिली आहे. त्यांचे खासदार भारताच्या विभाजनाची भाषा करत आहेl. दक्षिण भारताला वेगळी करण्याची भाषा करत असल्याचा आरोप मोदींनी काँग्रेसवर केला.