Deekshabhoomi : नागपूर येथील दीक्षाभूमी परिसरातील अंडरग्राऊंड पार्किंगला टोकाचा विरोध करण्यात आला. दीक्षाभूमीवरील पार्किंगला विरोध करत बांधकामासाठी आणलेले साहित्य तोडफोड करून जाळण्यात आले. अशातच सोमवार 1 जुलै रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठी घोषणा केली. दीक्षाभूमी येथील अंडरग्राऊंड पार्किंगच्या कामाला स्थगिती देण्यात आली आहे. 2 जुलै रोजी विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार या विषयावर आक्रमक झाले.
आंदोलन तीव्र झाल्यावर लाठीचार्ज करण्यात आला. भंते यांच्यावर कारवाई करण्यात आली, हे योग्य झाले नाही. परिस्थिती नियंत्रणात आणून त्यावर तोडगा काढण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी पाहणीसाठी समिती पाठवावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी 2 जुलैला विधानसभेत केली. त्याचबरोबर इंदू मिल येथील बाबासाहेबांच्या स्मारकाचे काम होत नाही.चवदार तळ्याचे काम देखील होत नसल्याने वडेट्टीवार यांनी सरकारला खडे बोल सुनावले.
पोलिस छावणीचे स्वरूप
नागपूर दीक्षाभूमीला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. त्याठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पार्किंगला जनतेचा विरोध आहे. अंडरग्राउंड पार्किंगसाठी खोदकामामुळे बौद्ध स्तुपाला धोका होऊ शकतो. 1 जुलै रोजी लाठीचार्ज झाला, हा भावना भडकवण्याचा प्रयत्न आहे. मी घटनास्थळी भेट दिली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अध्यक्षांनी पाहणीसाठी समिती पाठवावी, अशी मागणीही विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
Deekshabhoomi : पंधरा दिवसांत काम नाही झाले, तर जनता स्वतः येईल
दीक्षाभूमी येथे भूमिगत पार्किंगचे काम सुरू करण्यात आले आहे. दीक्षाभूमीच्या या मेकओव्हरसाठी सरकारने मोठा निधी मंजूर केला आहे. या निधीचा वापर करून कामाला सुरुवात करण्यात आली. परंतु दीक्षाभूमी परिसरात खड्डा खोदल्यानंतर संतापाची लाट उसळली. यानंतर संतप्त जमावाने या परिसरात जाळपोळ केली. साहित्याची तोडफोड केली. त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. जाळपोळ झाल्यानंतर तातडीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केले. तातडीने कामाला स्थगिती देण्यात आली. जोवर यासंदर्भात तोडगा निघत नाही, तोवर कामाला सुरुवात करण्यात येणार नाही, असे फडणवीस म्हणाले. अशातच विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दीक्षाभूमीला भेट दिली.
दीक्षाभूमीला भेट दिल्यानंतर वडेट्टीवार यांनी यासंदर्भात मंगळवारी (ता.दोन) विधानसभेत मुद्दा मांडण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार वडेट्टीवार यांनी मंगळवारी यावर विधानसभेत आवाज उठवला. विधानसभेत त्यांनी यावर आक्रमक भूमिका घेतली. सरकारने दीक्षाभूमीसाठी निधी मंजूर केला. मात्र तेथे खड्डा खणल्यामुळे भाविकांची गैरसोय होत असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली. सरकारने येथे येणाऱ्या अनुयायींच्या भावना जाणून घेत योग्य पद्धतीने काम करावे, अशी सूचना त्यांनी केली.