Assembly Election : विधानसभेच्या निवडणुका सणांमुळे लांबतील असं चित्र आहे. असं असताना आता निवडणुका नियोजित वेळेतच होतील असंही बोललं जात आहे. त्यामुळे विद्यमान आमदार तसेच इच्छुक उमेदवार खिसा पाहून खर्च करून लागले आहेत. याचा परिणाम असा झाला की, जिल्ह्यात कार्यक्रमांची सरबत्ती लागली आहे. प्रत्येक कार्यक्रमात नेते मंडळीची उपस्थिति पहायला मिळत आहे. दरम्यान कार्यक्रमात जेवढी तत्परता दाखवली आहे, तेवढी कामांमध्ये दाखवली असती, तर ही वेळ आली नसती, अशी चर्चा आता दबक्या आवाजात सुरु झाली आहे.
जनता दरबार
लोकांच्या समस्या जाणण्यासाठी सुरुवातीला लोकप्रतिनिधी जनता दरबार भरवीत असत. त्यातूनच जनसामान्यांच्या समस्यांच्या निपटारा होत असे. परंतु, जनता दरबार कुठे, कसे गायब झाले हे समजणे कठीणच आहे. सध्या तर सर्वत्र जनतेच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र स्वतः भोवतालच्या गराड्याकडे अधिक लक्ष देण्याचेच काम सुरू आहे. त्यामुळे जनता आपसूकच दूर जात असल्याचे जाणवते. मात्र, जेव्हा आपला कार्यकाळ संपत येतो तेव्हा मात्र आमदार, खासदार महोत्सव सुरु होतात. आपापल्या क्षेत्रात ज्या परिसरात ज्या कार्यक्रमांची आवड आहे त्या प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
सणासुदीचा फायदा
महाराष्ट्रात सर्वत्रच आपल्या भागात मोठे मोठे दहीहंडी उत्सव झाले. पोळा झाला. गणपती उत्सव, नवरात्री उत्सव पुढे आहेच. यात पैसा खर्च केला जाईल. तर आपल्या कार्यकर्त्यांपुढे अधिकाऱ्यांना खडसावून आपला दबदबा दाखविण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपण जनतेसाठी काय केले हे सांगण्या अगोदर जनतेनेच स्वतः सांगितल्यास संभाव्य उमेदवारांना फारशी कसरत करावी लागणार नाही. निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच सणांच्या शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छांचे फलक पहायला मिळतात. या फलकावरील संभाव्य शुभेच्छा देणाऱ्यांचे नाव तसेच फोटो पहिल्यांदाच पाहिल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. राजकीय पक्षाकडून आपणालाच उमेदवारी मिळावी यासाठी जोर-शोर प्रयत्न सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र ‘ये पब्लिक है सब जानती है’ असा ही सूर दबक्या आवाजात ऐकायला येऊ लागला आहे.