Political War : सामना वृत्तपत्रात छापून आलेल्या अग्रलेखाला भाजप विधानपरिषद गटनेते प्रवीण दरेकर यांनी ट्विट करून चोख प्रत्युत्तर दिले आहे. ‘चिंगम’ संजय राऊत यांनी ‘सिंघम’ देवेंद्र फडणवीसांची चिंता करू नये. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अग्रलेख लिहून टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न आहे. पण ही थुंकी संजय राऊत यांच्याच तोंडावर पडली असल्याचा पलटवारही दरेकर यांनी केला आहे.
दरेकर यांचे ट्विट
आमदार दरेकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, महाराष्ट्रातील स्वयंघोषित चघळून चोथा झालेल्या ‘चिंगम’ संजय राऊत यांनी ‘सिंघम’ देवेंद्र फडणवीस यांची चिंता करू नये. ज्यांनी आयुष्यभर ‘चमचेगिरी’ केली, त्या संजय राऊत यांना धर्मवीरची पटकथा काय कळणार? धर्मवीरची पटकथा लिहिणं आणि ‘सामना’च्या अग्रलेखातून ‘चमचेगिरी‘ करणं, यात फरक असतो.
‘चिंगम’ राऊतांनी ‘सिंघम’ची चिंता करू नये..
देवेंद्र फडणवीस हे आधुनिक अभिमन्यू आहेत. तुमच्यासारख्या कितीही कपटी ‘शकुनीं’नी त्यांना घेरलं तरी तुमचं ‘चक्रव्यूह’ भेदण्यासाठी ते सक्षम आहेत. त्यामुळे तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या चित्रपटाची काळजी करू नका. फडणवीस जी पटकथा लिहितील, तो चित्रपट सुपरहिटच होईल, असेही आमदार दरेकर म्हणाले.
खलनायकाची भूमिका..
पत्राचाळीत मराठी माणसांची घरं तुम्ही हडप केली. त्यावर ‘पत्राचाळीचा लुटारू राऊत’ या चित्रपटाची पटकथा कशी वाटेल, याचा विचार करा. मराठी माणसाला रस्त्यावर आणण्यासाठी त्यात तुम्ही जी खलनायकाची भूमिका वठवली. ती महाराष्ट्रातील जनता विसरली नाही. देवेंद्र फडणवीस इन्फ्रामॅन आणि महाराष्ट्राचे नायक आहेत. त्यासाठी संजय राऊत तुमच्यासारख्या ‘नालायका’च्या सर्टिफिकेटची गरज नाही, असा घणाघातही प्रवीण दरेकर यांनी केला.