Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत नगरविकास मंत्री म्हणून बारीक लक्ष दिले आहे. मुंबई बदलतेय त्यात त्यांचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे योगदान आहे. मुंबईत आता वाहतूक कोंडी हा मोठा विषय झाला आहे. वाहतूक कोंडी संदर्भात आपल्याकडे धोरण प्रलंबित आहे. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शासन स्तरावर धोरण, समिती लवकर कार्यान्वित कशी होईल, याची काळजी घ्यावी, अशी विनंती भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान केली.
दरेकर म्हणाले, राज्यपालांचे अभिभाषण म्हणजे सरकारचा चेहरा असतो. राज्यपालांच्या अभिभाषणात सरकार नेमकं काय करणार किंवा काय केले हे सांगितलेय. शिंदे यांच्या नेतृत्वात दोन वर्ष झालेलं महाराष्ट्रातील काम आणि आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होऊ घातलेले काम, याबाबत जनतेच्या मनात विश्वास आहे. ज्या ज्या घोषणा केल्या, त्या पूर्ण करण्याचे काम सरकारने केले. आता निवडणुकीत आम्ही जनतेला जे शब्द दिलेत, ते पूर्ण करणार आहोत.
लाडकी बहीण
लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्याचा निर्णय होता. विरोधकांनी हे निवडणुकीपुरते असल्याचे सांगून निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींना वाऱ्यावर सोडणार असल्याचे म्हटले होते. परंतु तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संवेदनशील आणि जनतेतील नेते होते. शब्द दिल्यानंतर त्याची पूर्तता कशी करायची, याचे उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत. असा नेता राज्याच्या मु्ख्यमंत्रिपदी बसल्यानंतर दिलेली वचनं एक लाख टक्के राज्य सरकार पूर्ण करेल, असेही दरेकर म्हणाले.
Akola BJP : ज्यांना हात धरून बाहेर काढलं, त्यांना पक्षानेही डावललं
लाडक्या बहिणींचे हित जपत असताना युवकांच्या संदर्भात काय करणार आहोत याचा उहापोह केला गेलाय. कौशल्य विकासच्या माध्यमातून 10 हजारापर्यंत मदत करून युवा पिढीला भक्कम करण्याचे काम सरकारच्या माध्यमातून दिसतेय. सर्व घटकांसाठी काम होतेय. मुंबईसाठी काम होतेय. मुंबईचे जागतिक स्तरावर आगळे वेगळे स्वरूप पाहायला मिळणार आहे.
प्रथम राज्य
महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात गुंतवणुकीत देशात सर्वात प्रथम राज्य आहे आणि प्रथमच राहील. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येतेय. मराठी भाषेच्या संदर्भात अभिजात दर्जा द्यावा, अशी कित्येक वर्षाची मागणी केंद्राकडे होती. अनेक सरकारे आली परंतु मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचे काम आमच्या एनडीए सरकारने केले. मराठी भाषेचे जतन करण्यासाठी केंद्र सरकार अधिकचा निधी देणार असल्याचेही दरेकर म्हणाले.
सिंचन क्षेत्रात झालेले काम अभूतपूर्व आहे. 4 लाख 33 हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होईल. यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा मंत्री म्हणून पुढाकार घेतला. आज विदर्भात अधिवेशन होतेय. 50 वर्षात विदर्भात प्रकल्प पुढे गेले नसतील. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात 2 सुप्रमा दिल्या गेल्या. आमच्या काळात 129 सुप्रमांना मान्यता देण्यात आली. यावरून या सरकारला गती असल्याचे दिसतेय.
पंतप्रधान यांची इच्छा
आर्थिक क्षेत्रात महाराष्ट्र मोठा झाला पाहिजे. मुंबई आर्थिक हब व्हायला हवे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे. केवळ त्यांची इच्छाच नसते तर ते पाठबळही देतात. ज्यावेळी त्यांची शिवाजी पार्कला जाहीर सभा झाली, तेव्हा ते म्हणाले होते की, महाराष्ट्र देशाला दिशा देतो. महाराष्ट्र प्रगतीपथावर आला, मजबूत झाला तर देश मजबूत होऊ शकतो. जेव्हा राष्ट्राला पुढे न्यायचे असेल तर महाराष्ट्र प्रगतीपथावर जाणे अत्यंत गरजेचे आहे. मुंबई आणि महाराष्ट्र बदलतोय. शिक्षण, आरोग्य क्षेत्रात चांगल्या प्रकारचे काम होतेय, असेही दरेकर म्हणाले.