मनोज जरांगे यांनी महायुती सरकारवर किंवा सरकारमधील मंत्र्यांवर आरोप केले की त्यांना गटनेते प्रवीण दरेकर यांच्याकडून उत्तर आलेच पाहिजे. याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. जरांगे यांनी आरक्षणातील सर्वांत मोठा अडथळा देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोप केला होता. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले होते. पण दरेकर यांनी एक खोचक सवाल करून जरांगेंवर टीका केली आहे.
मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे दरेकरांनी वेळोवेळी कौतुकच केले आहे. पण, जरांगे यांनी राजकीय भूमिका घेणे, महायुतीतील नेत्यांवर जातीय टीका करणे त्यांना पटले नाही. त्यामुळे दरेकरांनीही जरांगेंना जोरदार प्रत्तुत्तर द्यायला सुरुवात केली. गेल्या काही दिवसांपासून जरांगे-दरेकर असा सामना जवळपास नियमीत बघायला मिळत आहे.
‘देवेंद्र फडणवीसच मराठा आरक्षणात अडथळा आणत आहेत’ असा आरोप जरांगे यांनी केला होता. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यात फडणविसांचाच मोठा वाटा असल्याचे सांगत खुलासा केला होता. तर फडणवीस यांनी ‘माझा अडथळा वाटत असेल तर राजीनामा देईन’ अशी भूमिका घेतली. पण जरांगे यांच्याकडून होणारे आरोप थांबले नाही. त्यामुळे प्रवीण दरेकर यांनी जरांगेंना खडे बोल सुनावले आहेत.
‘मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की मराठा समाजाला आरक्षण देण्यात देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर भूमिका घेत राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. तरीही जरांगे बोलत असतील तर त्यांचा खोटारडेपणा आता जगापुढे उघड झाला आहे. ते कुणाच्या तरी सांगण्यावरून बोलत आहेत, असे दिसत आहे,’ अशी टीका दरेकर यांनी केली. त्याचवेळी ‘काय पाटील? कुणाची सुपारी घेऊन बोलताय?’ असा खोचक सवालही दरेकरांनी जरांगे यांना केला.
‘शिंदे म्हणाले तर मी राजीनामा देईन’
मनोज जरांगे यांनी आरोप केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ‘जरांगे यांच्या आरोपांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहमत असतील तर मी राजीनामा देईन. राजीनामा देऊन राजकीय सन्यास घेईन,’ असं आव्हान उपमुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. ‘जरांगे यांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे. त्यांनी एक बाब लक्षात घ्यावी की, राज्याचे सगळे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना जरांगेंचे आरोप मान्य असतील तर पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे,’ अशी भूमिका फडणवीस यांनी घेतली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन मराठा समाजाला आरक्षण देण्यात फडणविसांचे योगदान मोलाचे असल्याचे सांगितले.