Mahayuti News : पुणे येथील ड्रग्ज प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. महायुतीतही या तणावाचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे महायुतीच्या दोन पक्षाचे नेते सध्या एकमेकांवर तोंडसुख घेताना दिसत आहेत. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी, ‘मी पालकमंत्री असताना पुण्यात असं घडलं नव्हतं, असे म्हणत पुण्यातील सध्याच्या पालकमंत्र्यांकडे अप्रत्यक्षपणे बोट दाखविले होते. त्यावरुन, आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून अमोल मिटकरी यांनीही पलटवार केला आहे. अमोल मिटकरींनी चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मिटकरींच्या या आरोपावर आता भाजप नेते तथा आमदार प्रवीण दरेकर यांनीही अमोल मिटकरी यांना खोचक टोला लगावला आहे.
https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35
अमोल मिटकरी यांना तोंडाला आवर घालण्याची गरज आहे, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आधीच महायुतीत असलेला तणाव आणखी वाढण्याची शक्यता दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या नंतर राज्यातील राजकारण तापताना दिसत आहे. महायुतीत तर घटक पक्षातील नेतेच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडताना दिसत आहेत. त्यामुळे आगामी काळात याचे मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. सध्या पुणे ड्रग्ज आणि पब प्रकरणावरुन राजकीय वातावरण गरम झालं आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका होत आहेत. अशातच आता, माझ्या काळात असं घडलं नाही, असे म्हणत पुण्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सध्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडेच बोट दाखविले होते.
आता राष्ट्रवादीच्याही नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अमोल मिटकरींनी चंद्रकात पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर, आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, असे म्हटले आहे. यामुळे, महायुतीतील तणाव वाढण्याची शक्यता आहे. आगामी काळात नेत्यांमध्ये वाढत असलेल्या वक्तव्यावर आता वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले होते मिटकरी?
चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्या संदर्भात केलेल्या विधानावर आमदार अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांनी चंद्रकांत दादा पुण्याचे पालकमंत्री असताना ड्रग्ज सासारख्या चिंताजनक घटना घडल्या नाहीत, कारण त्यांच्या आशीर्वादाने हे सर्व काही पुण्यात व्यवस्थित सुरू होते
Gondia Politics : गोंदियाचे पालकमंत्रिपद नको रे बाबा; मंत्र्यांना वाटते भीती?
असे मिटकरी म्हणाले. अजितदादा पालकमंत्री झाल्यामुळे या सर्व चिंताजनक घटना आज उघड झाल्या म्हणून चंद्रकांत दादा व्यथित आहेत. अवैध धंद्यांना पाटील यांच्या कार्यकाळात राजाश्रय मिळत होता, असेही अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
दरेकर यांचे प्रत्युत्तर
आमदार प्रवीण दरेकर यांनी मिटकरींना प्रत्युत्तर दिले आहे. दरेकर म्हणाले, अमोल मिटकरी यांनी तोंडाला आवर घालण्याची गरज आहे, पक्षाने पाहावे त्यांना काय अधिकार आहेत. नेहमी बाष्पळ बडबड असते, असे म्हणत मागच्या एका प्रकरणाचा दाखलही प्रविण दरेकर यांनी यावेळी दिला. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी मिटकरींना समज देण्याची गरज आहे. महायुतीत तडा जाणार, असे वक्तव्य त्यांनी करू नये. आपण बोलतो ते महायुतीला हानिकारक आहे, प्रदेशाध्यक्षांनी त्यांना याबाबत सांगावे,’’ असे आवाहनही प्रवीण दरेकर यांनी सुनिल तटकरेंना उद्देशून केले आहे.