प्रवाशांच्या समस्या, तक्रारीवजा सूचनांचे स्थानिक पातळीवर जलदगतीने निराकरण होण्याच्या उद्देशाने बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक एसटी आगारात (डेपो) दर सोमवारी व शुक्रवारी ‘प्रवासी राजा दिन’ आयोजित करण्यात येणार आहे. या दिवशी एसटीचे विभाग नियंत्रक एका आगारात जाऊन प्रवाशांच्या समस्या, तक्रारी, सूचना ऐकून घेतील. त्या तातडीने सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करतील. त्यामुळे, प्रवाशांचे समाधान होण्याबरोबरच प्रवासी सेवेचा दर्जा व गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे. यामुळे प्रवाशांना अधिक सुखकर प्रवास आणि त्यांच्या समस्येचे निराकरण होणार आहे.
एसटीच्या प्रत्येक आगारामधून विविध बसमधून दररोज सुमारे ५ हजार प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली जाते. त्यासाठी ५० हुन अधिक बस वेगवेगळ्या मार्गावर धावतात. एसटीकडून सेवा वेळेत आणि खात्रीशीर मिळावी, अशी किमान अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जाते. यासह इतर तक्रारींचे निराकरण वेळेत न झाल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. गर्दीच्यावेळी जादा बसचे नियोजन केले जावे, ठरलेले थांबे घ्यावेत, चालक-वाहक यांनी प्रवाशांशी सौजन्याने वागावे, एसटी बसस्थानके, प्रसाधनगृहे ही स्वच्छ, निर्जंतुक हवीत, उपहारगृह स्वच्छ असावे. ताजे खाद्यपदार्थ मिळावेत, ध्वनिक्षेपकावरून प्रवाशांना समजेल, अशा आवाजात माहिती दिली जावी, अशा काही प्रवाशांच्या मागण्या आहेत.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून प्रवाशांना भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्या, तक्रारी व सुचनांचे आगार पातळीवर जलदगतीने निराकरण करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक आगारात दर सोमवार व शुक्रवार ला सकाळी 10 ते 2 या वेळेत “प्रवासी राजा दिन” व दुपारी 3 ते 5 या वेळेत “कामगार पालक दिन” आयोजित करण्यात येणार आहे. प्रवाशी आणि महामंडळाचे कामगार यांनी याचा लाभ घेऊन समस्यांचे निराकरण करावे, असे आवाहन परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक यांनी केले आहे.
परिवहन महामंडळाच्या आगारामध्ये सकाळी 10 ते दुपारी 2 दरम्यान प्रवासी राजा दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळेत प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा-महाविद्यालये त्यांच्या समस्या, तक्रारी, सूचना लेखी स्वरुपात मांडू शकतील. तसेच दुपारी 3 ते सांयकाळी 5 दरम्यान कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार आहे. संघटना, कर्मचाऱ्यारी वैयक्तिक प्रश्न, तक्रारी लेखी स्वरुपात घेऊन तक्रारीचे किंवा समस्यांचे तात्काळ निराकरण करतील.
जिल्ह्यातील आगारांचे दिवस
बुलडाणा विभागातील आगारामध्ये प्रवासी राजा दिन, कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार आहे. खामगाव आगार येथे शुक्रवार दि. 20 डिसेंबर, मेहकर येथे सोमवार, दि. 23 डिसेंबर, मलकापूर येथे शुक्रवार, दि. 27 डिसेंबर, जळगांव जामोद येथे सोमवार, दि. 30 डिसेंबर, शेगांव येथे शुक्रवार, दि. 3 जानेवारी रोजी प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन कार्यक्रम घेण्यात येणार आहे.