Chandrapur Politics : चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभा मतदारसंघातून नुकत्याच निवडून आलेल्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचा भाऊ प्रवीण काकडे याने काल (ता. 19) कर्नाटक एम्टा कोळसा खाणीच्या अधिकाऱ्यांवर दादागिरी केली. या घटनेनंतर काँग्रेसच्या गोटात, राजकीय वर्तुळात आणि एकंदरीतच जनसामान्यांत विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
प्रतिभा धानोरकर या काँग्रेसचे दिवंगत नेते बाळू धानोरकर यांच्या पत्नी आहेत. बाळूभाऊंच्या जागीच यावेळी त्यांना उमेदवारी मिळाली आणि त्या खासदार झाल्या. अद्याप खासदारकीचा शपथविधीही होणे बाकी आहे. बाळू धानोरकर हयात असतानाही प्रवीण काकडे त्यांचे काम बघायचे. तेव्हा कधीही अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून आणि धमक्या देण्यापर्यंत त्यांची मजल गेली नाही. पण बहीण खासदार होताच प्रवीण काकडे यांच्या ‘आंगात आली’, येवढी अंगार तर बाळूभाऊंनी पण केली नव्हती, असंच बोललं जात आहे.
बाळू धानोरकर हे कट्टर शिवसैनिक होते. त्यामुळे आक्रमकता त्यांच्या अंगी सुरुवातीपासूनच होती. शिवसेनेकडून ते आमदार झाले होते. त्यानंतर 2019 मध्ये आपण खासदार होऊ शकतो, हा अंदाज त्यांना आला. शिवसेनेकडून तिकीट मिळालं नाही म्हणून त्यांनी काँग्रेसमध्ये नशीब आजमावलं. अनेक नाट्यमय घडामोडींनंतर त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. तेव्हा भाजपचे बलाढ्य नेते हंसराज अहीर यांना पराभूत करून बाळू धानोरकर खासदार झाले. येवढेच नव्हे तर महाराष्ट्रातून काँग्रेसचे एकमेव खासदार होण्याचा इतिहास त्यांना रचला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या इतर उमेदवारांसोबत पत्नी प्रतिभा यांना पक्षांतर्गत विरोध पत्करून वरोरा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आणले.
Chandrashekhar Bawankule : ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं, म्हणून त्यांना मुस्लिम मते मिळाली
शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आल्यानंतर बाळू धानोरकर पक्षात लवकरच स्थिरावले. त्यांनी आक्रमकपणा थोडी कमी केली आणि राजकारणाची योग्य दिशा पकडली. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक आणि इतर निवडणुकांमध्ये त्यांचा नेहमीच वरचष्मा राहिला. हे करत असताना त्यांच्या कुण्याही पीए ने किंवा कुठल्याही सहकाऱ्याने असे वर्तन केले नव्हते, जे प्रवीण काकडे यांनी काल केले. खासदार बहीणीसमोरच त्यांनी कर्नाटक एम्टाच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून त्यांची ‘ऐसीतैसी’ केली. एका कार्यकर्त्याने यावेळी अधिकाऱ्याला मारहानही केली. स्वतः खासदारांनी काही करणे, हे समजले जाऊ शकते. पण त्यांच्या भावाने केलेल्या त्या कृत्याची मात्र सर्वत्र निंदा केली जात आहे.
फटका बसण्याची शक्यता
राजकारणात प्रवेश करते झाले की अनेक जण दादासाहेब, नानासाहेब, बाळासाहेब होतात. पण बाळू धानोरकर यांनी कधीही स्वतःला बाळासाहेब म्हणवून घेतले नाही. येवढे ते साधे होते. त्यांच्या पत्रांवर आणि फलकांवरही ‘बाळू धानोरकर’ येवढाच उल्लेख असायचा. बडेजाव त्यांना कधीही आवडला नाही. पण हा माणूस कामात मात्र वाघ होता. कार्यकर्त्यांची भली मोठी फळी त्यांनी उभारली आणि सांभाळली होती. आक्रमकता त्यांच्यामध्ये होती. पण आगाऊपणा नव्हता. प्रवीण काकडे यांनी जे केले, तो आगाऊपणा आहे. त्याचा फटका खासदार मॅडमला बसू शकतो. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी अशा आगाऊपणावर कंट्रोल ठेवायला हवा, अशा प्रतिक्रिया राजकीय जाणकारांकडून व्यक्त होत आहेत.
असे म्हटले जाते की,‘यश मिळवणे तेवढे अवघड नसते, जेवढे ते टिकवणे अवघड असते’. मागील काळात प्रतिभा धानोरकर आमदार असताना बाळूभाऊंची साथ त्यांना होती. पण आता त्या खासदार झाल्या आहेत आणि चंद्रपूरपासून ते आर्णीपर्यंत अवाढव्य पसरलेला लोकसभा मतदारसंघ त्यांनाच सांभाळायचा आहे. तेव्हा अशा आगाऊपणाच्या प्रवृत्तींवर त्यांनी नियंत्रण ठेवले पाहिजे, असे जाणकारांचे मत आहे. केवळ खासदाराचा भाऊ आहे म्हणून प्रवीण काकडे यांना कुणालाही शिवीगाळ करण्याचा किंवा धमकावण्याचा अधिकार मिळत नाही. बाळू धानोरकरांच्या प्रेरणेने खासदार प्रतिभा धानोरकर त्यांचा राजकीय वारसा पुढे नेत आहेत. तसा उल्लेख त्या नेहमी करतात. तेव्हा अशा प्रवृत्तींवर त्यांनी नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.