Prataprao Jadhav : बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून येण्याचा विक्रम करणारे बुलढाण्यात शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांची केंद्रीय मंत्रीपदी निवड झाली आहे. दरम्यान काल सायंकाळी देशाच्या राष्ट्रपतींसमक्ष त्यांनी शपथविधी पुर्ण केली. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आडत व्यापारी ते केंद्रीय मंत्रीपदापर्यंतची मजल असा प्रतापराव जाधव यांचा आजवरचा राजकीय प्रवास राहिला आहे.
बुलढाण्यातून सलग चौथ्यांदा निवडून आलेले शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांना केंद्रात मंत्रिपद मिळाले आहे. 1997 नंतर तब्बल 22 वर्षानंतर बुलढाणा जिल्ह्याला केंद्रातील मंत्रिपद मिळाले आहेत. त्यांना कोणतं मंत्रिपद मिळालं, हे अद्याप समोर आलेले नाही. 9 जुन रोजी त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शिवसेनेतील फुटीनंतर प्रतापराव जाधव एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी उभे होते. लोकसभा निवडणुकीतही त्यांनी बाजी मारली. 1990 पासून ते राजकारणात सक्रीय आहेत. पंचायत समिती सदस्य, आमदार, राज्यात क्रीडा मंत्री, खासदार ते आता केंद्रीय मंत्री, असा प्रतापराव जाधवांचा राजकीय प्रवास राहिला आहे. त्यांनी अनेक संसदीय समितीत सदस्य म्हणून काम पाहिलेय. हा त्यांचा राजकीय प्रवास असला तरी सुरुवात अडत व्यापारी ते केंद्रीय राज्यमंत्रीपद असे भाग्यशाली व्यक्ती म्हणूनही प्रतापराव जाधव यांचा परिचय होतो.
जाधव यांची राजकीय सुरुवात
प्रतापराव जाधव यांचा जन्म 25 नोव्हेंबर 1960 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रूक या गावात झाला. त्यांनी बारावीपर्यंत मेहकर येथे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर प्रतापराव जाधव यांनी सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकीर्दीला प्रारंभ केला. मेहकर बाजार समितीमध्ये त्यांनी अडत व्यापारी म्हणून काम केले आहे. त्यावेळी त्यांनी बाजार समितीमधील पॅनल उभे करून त्या ठिकाणी देखील सत्ता ताब्यात घेतली.
मेहकर विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार तथा राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये क्रीडा व युवक कल्याण तसेच पाटबंधारे राज्यमंत्री (लाभ व विकास) खाते सांभाळत त्यांनी जिल्ह्याची सिंचन क्षमता वाढविण्यावर भर दिला होता. दरम्यान आता केंद्रीय मंत्रीपदी त्यांची वर्णी लागली असून बुलढाणा जिल्ह्यात शिंदेसेनेला चांगलीच उभारी मिळणार आहे.
यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विदर्भात एकमेव जागा मिळवत बुलढाण्याचा गड प्रतापराव जाधव यांनी राखला. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात दोन शिवसैनिकांच्या लढतीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र खेडेकर आणि शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा पराभव करत प्रतापराव जाधव यांनी विजय मिळवलाय. या विजयाचं बक्षीस प्रतापराव जाधव यांना मंत्रिपदाच्या रुपाने मिळाले आहे.
Raosaheb Danve : काय सांगू…! मुलाच्या मतदारसंघातूनच मिळाली पछाड
25 नोव्हेंर 1960 रोजी प्रतापराव जाधव यांचा मेहकर येथे जन्म झाला. सुरुवातीपासून त्यांना राजकारण आणि समाजकारणात रुची होती. प्रतापराव जाधव यांचा विवाह 1 एप्रिल 1983 रोजी राजश्री यांच्यासोबत झाला होता. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. प्रतापराव जाधवांचं शिक्षण बुलढाणा, चिखलीतील शिवाजी कॉलेज येथे त्यांचं शिक्षण झालं. त्यांचं शिक्षण बीए दुसऱ्या वर्षांपर्यंतच झालेले आहे.
प्रतापराव जाधवांचा अल्प राजकीय परिचय
1990-1995 – सभापती, मेहकर तालुका खरेदी विक्री समिती. 1992-95 – पंचायत समिती सदस्य. 1992-1996 – सभापती मेहकर तालुका, उपज मंडी, मेहकर जिल्हा बुलढाणा. 1995-2015 – संचालक, जिल्हा को-ऑपरेटिव्ह बँक बुलढाणा. 2010-2015 – उपाध्यक्ष, जिल्हा को-ऑपरेटिव्ह बँक, बुलढाणा. 1995-2009 – सदस्य महाराष्ट्र विधानसभा (तीन वेळा, 15 वर्ष). 1997-1999 – क्रीडा मंत्री, युवा कल्याण आणि सिंचन राज्य मंत्री, महाराष्ट्र सरकार. 2009 – पहिल्यांदा खासदार म्हणून संसदेत पोहचले. 2009 – उद्योग समितीचे सदस्य. 2014 – दुसऱ्यांदा खासदार म्हणून संसदेत पोहचले. 2014-2018 – सदस्य, सल्लागार समिती, खाद्य प्रंस्कारण उद्योग मंत्रालय.
12 डिसेंबर 2014 ते 8 जानेवारी 2018 – सदस्य, इतर मागासवर्ग कल्याण समिती. 2019 – तिसऱ्यांदा खासदार म्हणून संसदेत पोहचले. 2019-2024 – हाऊस समितीचे सदस्य. 2019 ते 2022 – सभापती ग्रामीण विकास आणि पंचायती राज स्थायी समिती. 2019-2024 – सदस्य संसदीय राजभाषा समिती