Maharashtra Politics : एनडीएमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे आता इतरांची मदत घेऊन सरकार स्थापल्या जाणार आहे. दरम्यान प्रत्येकी 4 खासदारांच्या मागे एक कॅबिनेट मंत्रिपद देण्याचं ठरलं आहे, अशी माहिती मिळतेय. असे असले तर महाराष्ट्रातून शिंदे सेनेमधून 3 वेळा आमदार आणि आता चौथ्यांदा बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेले प्रतापराव जाधव हे एनडीए मंत्रिमंडळाच्या फॉर्मुल्यात फिट बसत असल्याचे दिसते.
लोकसभा निवडणुकांनंतर दिल्लीतील राजकीय घडामोडींनी वेग धरला आहे. 4 जूनला निकाल लागल्यानंतर दिल्लीत एनडीए आणि विरोधकांच्या इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. देशभरातील लोकांच्या नजरा दिल्लीतील घडामोडींवर खिळल्या आहेत. एकीकडे एनडीएकडून सत्ता स्थापन करण्यासाठी वेगानं हालचाली सुरू आहेत. अशा परिस्थिती इंडिया आघाडीच्या कुठल्याही नेत्याच्या संपर्कात न राहण्याच्या सूचना खासदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सेना काल सायंकाळी दिल्लीला रवाना झाली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, खासदार प्रतापराव जाधव, खासदार संदीपान भुमरे, खासदार धैर्यशील माने, खासदार रवींद्र वायकर, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार संजय मंडलिक, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, आमदार संजय शिरसाट आणि शिवसेना सचिव संजय मोरे हेदेखील होते.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने तीन कॅनिबेट मंत्रिपदे आणि दोन राज्यमंत्रिपद मागितली आहेत. चिराग पासवान यांच्या एलजेपी पार्टीने एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रिपदे मागितली आहेत. जीतनराम मांझी यांनी एक राज्यमंत्रीपद मागितले आहे. असे असले तरी 4 खासदारांच्या मागे एक कॅबिनेट व दोन राज्यमंत्री मंत्रीपद देण्याचं ठरल्याची माहिती आहे.
2 राज्यमंत्री आणि 1 केंद्रीय मंत्रिपद..
एनडीए आघाडी आता पुन्हा एकदा देशात सरकार स्थापन करण्यासाठी सज्ज झाली आहे. दरम्यान, एनडीएत सहभागी असलेल्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला नेमकं काय येणार, असे विचारले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार गटाला एक केंद्रीय तर एक राज्यमंत्रिपद तर शिंदेंच्या शिवसेनेला 2 राज्यमंत्री आणि केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे मंत्रिपदाच्या शर्यतीत असणाऱ्या संभाव्य नेत्यांचीही नावे आता समोर आली आहेत. यामध्ये बुलढाण्यातुन चार वेळा निवडून आलेले खासदार प्रतापराव जाधव यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे.