Ajit Pawar : लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल चार जून रोजी लागणार आहे. त्यानंतर विधानसभेच्या किंवा महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात. अशात नागपूर सुधार प्रन्यासवर नियुक्ती करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) होड लागली आहे. यामध्ये स्पर्धा वाढल्यामुळे हा निर्णय लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर घेण्यात येणार आहे.
नागपूर सुधार प्रन्यासवर नियुक्तीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा स्पर्धा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरचे असल्याने त्यांचाही कौल जाणून घेण्यात येत असल्याने अनेकांनी गप्प राहणे पसंत केले असल्याचे समजते. सुमारे सहा महिन्यांपासून हा विषय रेंगाळत आहे.
नागपूर शहरातील पदाधिकाऱ्यांमधील आपसातील मतभेद आणि चढाओढीमुळे नियुक्तीचे पत्र रोखून ठेवण्यात आले असल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर असल्याने त्यांचेही मत नियुक्ती करताना घेण्यात येणार असल्याचे कळते. अजित पवार चाळीस आमदार घेऊन महायुतीत सहभागी झाल्यानंतर त्यांच्यासोबत ग्रामीणचे अध्यक्ष बाबा गुजर आणि शहराचे अध्यक्ष प्रशांत पवार सर्वात आधी गेले होते.
अजित पवार यांच्यासोबत जाण्यापूर्वी अनेकांनी आधी अंदाज घेतला त्यानंतर हळूहळू ते सहभागी झाले. यांपैकी अनेक जणांना प्रामुख्याने ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांनी डीपीसीवर नेमून त्यांचे समाधान करण्यात आले. सुधार प्रन्यासवर विश्वस्त म्हणून नियुक्ती करताना अजित पवार यांनी सावध पवित्रा घेतला. शहराचे अध्यक्ष व प्रदेश प्रवक्ते प्रशांत पवार यांचे नाव यासाठी आघाडीवर आहे.
Raver Constituency : मतदान केंद्रावरही तो अधिकारी मद्यधुंद अवस्थेत
प्रदेश उपाध्यक्ष अनिल अहीरकर हेसुद्धा यासाठी इच्छुक आहेत. अजित पवार यांच्यासोबत त्यांचे जुने संबंध आहेत. महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे यासुद्धा उत्सुक आहेत. संबंधित तिन्ही इच्छुक एकमेकांच्या नावाला विरोध करीत असल्याने नियुक्तिपत्र रोखून ठेवण्यात आले असल्याची सूत्रांची माहिती आहे.
आता लोकसभेचा निकाल चार जूनला जाहीर झाल्यानंतर पुन्हा रस्सीखेच सुरू होणार आहे. कारण लगेच विधानसभा किंवा नागपूर महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. त्यापूर्वी आपल्या पदाधिकाऱ्यांना सुधार प्रन्यासवर नियुक्त करून त्यांना बळ देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने केला जाणार आहे. महायुती कायम राहिल्यास राष्ट्रवादी प्रामुख्याने उत्तर व मध्य नागपूरमधून महापालिकेसाठी काही उमेदवारांच्या तिकिटासाठी आग्रही राहणार असल्याचे समजते.