Prasad Lad : मराठा आरक्षणावरून राज्यात राजकारण तापलं आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. मनोज जरांगे यांची भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर टीका करताना पुन्हा एकदा जीभ घसरली. त्यामुळे आता संतप्त प्रसाद लाड यांनी जरांगेंना खुले आव्हान दिले आहे. मराठा समाजासाठी गेल्या 60 वर्षांत कुणी काय केले, यावर चर्चा करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी जरांगेंना केले आहे.
अवघ्या काही महिन्यांवर विधानसभेची निवडणूक आहे. मात्र त्यापूर्वी विविध मुद्द्यांवरून राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. प्रत्युत्तर देताना प्रसाद लाड यांनी मनोज जरांगेंवर जोरदार निशाणा साधला. ‘मनोज यांना डीडी नावाचा रोग झाला आहे. डीडी म्हणजे देवेंद्र द्वेषी..’ त्यांच्या याच टीकेला उत्तर देताना मनोज जरांगेंचा तोल सुटला. त्यांनी कॅमेऱ्यासमोर प्रसाद लाड यांच्यासाठी अपशब्द वापरले.
जरांगे नेमकं काय म्हणाले?
जरांगे यांनी लाड यांच्यावर टीका करताना ‘हा कोण बांडगुळ आता? माझ्या नादाला लागू नको, तू किती पैसेवाला आणि किती करप्ट आहे. मी तुला काय म्हटलंय का? तू आमच्या नादी लागू नकोस,’ असे शब्द वापरले. यावेळी त्यांनी काही अपशब्दही वापरलेत.
लाड यांचं प्रत्युत्तर!
प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी ट्विट करीत आवाहन केलं आहे. ‘गेल्या 60 वर्षांत काय झाले, याची चर्चा करण्याचे आव्हान जरांगे पाटील यांना दिले आहे. लाड यांच्या ट्विटची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
ट्विटमध्ये काय आहे?
‘बाय द वे, मि. जरांगे, मराठा समाजाला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे, ‘नरेटिव्ह’ची नाही! काल आपण मला शिविगाळ करताना जो आकांडतांडव केला आणि जे प्रमाणपत्र फडणवीसांच्या एसपीने नाकारले असे सांगितले, त्याची मूळ हकीकत जाणून घ्या. हे प्रकरण ठाणे एसपींच्या हद्दीतील नाही, तर ठाणे पोलिस आयुक्तांच्या हद्दीतील आहे. सखाराम रामचंद्र ढाणे, जिंतूर, परभणी यांनी 2023-2024 चे नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. (6 जून 2024 च्या जाहिरातीनुसार) त्यांच्याकडे 2024-25 या वर्षाचे प्रमाणपत्र होते. त्यामुळे त्यांनी स्वत: एक प्रमाणपत्र भरून खुल्या प्रवर्गातून संधी देण्यात यावी, असे हमीपत्र दिले. आमची तीच अपेक्षा आहे, तुम्ही योग्य माहिती घेत जा आणि मग बोलत जा. मी पुन्हा सांगतो, मराठा समाजासाठी मी कितीही शिवीगाळ ऐकायला तयार आहे. पण, मराठा समाजासाठी 60 वर्षांत कुणी काय केले यावर एकदा खुली चर्चा होऊन जाऊ द्या!’ असे लाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.