महाराष्ट्र

Lok Sabha Election : शक्तिप्रदर्शन करीत आंबेडकरांचे नामांकन दाखल

Akola Constituency : सलग अकराव्यांदा मतदारसंघात आजमावत आहेत नशीब!

Akola Constituency : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज अकोला लोकसभा मतदारसंघात शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रकाश आंबेडकर हे अकराव्यांदा या मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत. दरम्यान अर्ज भरल्यानंतर आंबेडकर यांनी सभा घेतली. अगदी मोजक्या शब्दात त्यांनी भाषण केले.महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश करण्यात आल्यानंतर जागा वाटपावरून सर्वच पक्षात एकमत नव्हते. नंतर वंचितने आपले काही उमेदवार जाहीर करून एकला चलो रे चा नारा दिला. प्रकाश आंबेडकर यांनी आधीच आपली उमेदवारी अकोला मतदारसंघात जाहीर करून काँग्रेसला कोंडीत पकडले. अकोला मतदारसंघात आंबेडकर लढण्यावर ठाम तर तिकडे महाविकास आघाडी आणि वंचित मधील जागावाटपाचा तिढा सुटलाच नाही. दरम्यान काँग्रेसने ही प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात अकोल्यात उमेदवार दिला. आणि वंचित आणि महाविकास आघाडी यांच्यातील तिढा कायम राहिला. अकोल्यात आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रकाश आंबेडकर यांनी शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

बोलणे टाळले

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी आंबेडकर यांनी संवाद साधला. काँग्रेस कडून सध्या तरी काही बोलणं नाही असे आंबेडकर म्हणाले तर येथील भाजपच्या खासदारांनी जिल्ह्यात विकास केला नसल्याचा आरोप त्यांनी केला. तर अनेक मतदारसंघात भाजपकडून घराणेशाहीला पुढे करीत उमेदवारी देण्यात आली आहे. अकोल्यातही तसच झालं आहे. तर आंबेडकर यांनी अमरावतीच्या जागेवरून बोलणं यावेळी टाळलं.

‘वंचित’चे शक्तिप्रदर्शन!

अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी शक्तिप्रदर्शन केले. पक्ष कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोठी रॅली काढण्यात आली. यावेळी प्रकाश आंबेडकर हे भर उन्हात पायीच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेले. ठिकठिकाणी आंबेडकर यांचे स्वागत करण्यात आले.

Lok Sabha Election : नाना पटोले यांचा आंबेडकरांपुढे पुन्हा मैत्रीचा हात

आता तिरंगी लढत!

काँग्रेस कडून डॉ. अभय पाटील, भाजपकडून अनुप धोत्रे आणि वंचित कडून प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे अकोल्यात लढतीचं चित्र सध्या तरी स्पष्ट झालं आहे. मात्र उमेदवारी अर्ज मागे घ्यायला वेळ असल्यानं नेमकं या मतदारसंघात काय होते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. तर भाजपचे बंडखोर माजी आमदार नारायण गव्हाणकर यांनीही आज अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!