EVM Voting : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. त्यानंतर नव्या सरकारचा शपथविधी देखील झाला. मात्र विधानसभा निवडणूक निकालानंतर विरोधकांकडून आता ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात आहे, यावरून आरोप -प्रत्यारोप सुरू असून या वादात आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील उडी घेतली आहे. मारकडवाडी मधील ग्रामस्थांकडून बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र त्यांना परवानगी नाकारली, यावर शेगावात प्रतिक्रिया देताना त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच यावेळी त्यांनी काँग्रेसवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे.
ईव्हीएमविरोधात आंदोलन
आंबेडकर म्हणले की, ईव्हीएमविरोधात आम्ही आंदोलन सुरू केलं आहे. निवडणूक आयोगाला पत्र लिहून मतदानाच्या दिवशी सायंकाळी सहानंतर झालेल्या मतदानाचे डिटेल्स मागितले आहेत. आयोगाच्या उत्तराची वाट पाहात आहोत. मारकडवाडी सारखी परिस्थिती गावागावत आहे, गावागावत रोष आहे. मारकडवडी येथील गावकाऱ्यांचा बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या निर्णयाला आडवीण्याचा सरकार किंवा पोलिसांना आधिकार नाही. सरकारने मारकडवाडी येथील ग्रामस्थांना अडविल्याने संशय बळवतो की यांनी गडबड केली आहे, असा थेट आरोप प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी बोलताना केले आहे.
काय केले?
पुढे बोलताना ते म्हणाले की, काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी मारकडवाडी या गावातील मतदान थांबाविण्याचा आदेश दिला होता का? याबाबत एकनाथ शिंदे यांनी खुलासा करावा. वेळ मिळाला तर मी मारकडवाडीला जाणार आहे. मी अनेकदा म्हटलं की हे ईव्हीएम पूर्वी काँग्रेसकडून पाडण्यासाठी वापरलं जात होतं. आता हे भाजपकडून निवडणुका जिंकण्यासाठी वापरलं जात आहे. सर्वोच्च न्यायालायचे न्यायाधीश ईव्हीएमचा मुद्दा बघायला तयार नाहीत. राज्यात आलेलं बहुमत हे ईव्हीएमचं बहुमत आहे, असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. संविधान खतरे में नाही तर काँग्रेस पक्ष खतरे में है. काँग्रेसने आम्हाला बाहेर का ठेवलं? याचा पहिल्यांदा खुलासा करावा. आम्ही भाजप सोबत कधीही समजोता करणार नाही, हे आम्ही ठरवलं आहे, असंही ते यावेळी म्हणाले.