Lok Sabha Election : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकी पूर्वी मोठी घोषणा केली आहे. राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. यावर आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले, राज ठाकरे यांनी भाजप पक्षाला नाही तर नरेंद्र मोदी यांच्या पक्षाला पाठिंबा दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुतीसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. “देशाच्या भवितव्यासाठी खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं की, मला काही अपेक्षा नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षांच्या महायुतीला फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे. माझं महाराष्ट्र सैनिकांना एकच सांगायचं आहे, की विधानसभेच्या कामाला लागा”, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मंगळवारी जाहीर केली. राज ठाकरे यांच्या भाषणानंतर आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. यावर बोलतांना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर हे अकोला लोकसभा मतदारसंघातील रिसोड तालुक्यात आपला प्रचार दौऱ्यावर असतांना माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले-
बीजेपी ही पार्टी संपली आता मोदी पार्टी झाली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी बीजेपीला नाही तर मोदी पार्टीला पाठिंबा दिलेला आहे. असा टोला आंबेडकर यांनी लगावला आहे. ते म्हणाले, मी उमेदवार म्हणून इथली परिस्थिती लोकांसमोर मांडली, आता मतदारांनी ठरवायचं आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांची निवडणूक लढवावी, आम्ही आमची लढवत आहोत. असंही बोलतांना आंबेडकर म्हणाले. एक दोन दिवसांमध्ये आम्ही यवतमाळ वाशिम संदर्भातील निर्णय घेऊ. तर मिळालेल्या निवडणूक चिन्हावर बोलतांना आंबेडकर म्हणाले, निवडणूक आयोगाने चिन्ह संदर्भातील आमचा अर्ज निकाली काढला नाही, आधी सिलेंडर देतो म्हणाले पण दिलं नाही, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे चिन्ह मिळाले, अकोल्यात कुकर चिन्ह मिळाले ते लोकांपर्यंत पोहोचले आहे. असा दावाही त्यांनी केला.