Assembly Election : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. दोन-तीन दिवसाच्या विश्रांतीनंतर आंबेडकर पुन्हा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत. पुणे येथील एका रुग्णालयात आंबेडकर यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. छातीमध्ये वेदना झाल्यानंतर त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. डॉक्टरांनी तपासल्यानंतर आंबेडकर यांच्या हृदयात गुठळी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांच्यावर अँजीओग्राफी आणि अँजीओप्लास्टी दोन्ही करण्यात आल्या. वैद्यकीय प्रक्रिया पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी आंबेडकर यांनी आयसीयूमधून व्हिडीओ संदेश दिला.
लवकरच प्रचार
या संदेशात आंबेडकर यांनी निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षण संपेल असं ठामपणे नमूद केलं. आंबेडकर रुग्णालयात असल्याने वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराची धुरा कोण सांभाळणार, असा प्रश्न उपस्थित होत होता. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली. ही यादी जाहीर झाल्यानंतर रविवारी (3 नोव्हेंबर) आंबेडकर यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. लवकरच ते प्रचाराला सुरुवात करतील, असे वंचित बहुजन आघाडीकडून जाहीर करण्यात आलं.
अधिकृत महिती
वंचित बहुजन आघाडीने प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत अधिकृत माहिती जाहीर केली आहे. आंबेडकर यांची प्रकृती उत्तम असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. सध्या काही दिवस आंबेडकर वेलनेस सेंटरमध्ये राहणार आहेत. पुढील 24 तास आयसीयूमध्ये वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली असतील. प्रकाश आंबेडकर यांना रुग्णालयात भरती केल्यानंतर सुजात आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं. आपापले मतदारसंघ सांभाळा, ते सोडू नका आम्ही सर्व बाळासाहेबांच्या सोबत असल्याचे, सुजात आंबेडकर यांनी म्हटले होते.
टक्कर देणार का?
वैद्यकीय उपचार यशस्वी झाल्यानंतर आता आंबेडकर पुन्हा एकदा महायुती आणि महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी सज्ज झाले आहेत. लवकरच वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा त्यांच्या हस्ते प्रकाशित केला जाईल असे सांगण्यात येत आहे. या जाहीरनाम्यामध्ये ‘आरक्षण बचाव’सह अनेक मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र हे मुद्दे कोणते आहेत या संदर्भात वंचित बहुजन आघाडीकडून अद्याप कोणताही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने मुस्लिम समाजासह विविध घटकातील उमेदवारांना संधी दिली आहे. त्यातून सोशल इंजिनिअरिंग साधण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आंबेडकर यांच्या या प्रयत्नाला महाराष्ट्रातील मतदार किती प्रतिसाद देतात हे लवकर स्पष्ट होणार आहे.