महाराष्ट्र

Buldhana : तुपकरांसाठी वंचितने सोडली जागा?

Ravikant Tupkar : बुलढाण्याची जागा जाहीर करण्याचे आंबेडकरांनी टाळले

Vanchit Bahujan Aghadi : विधानसभा निवडणुकीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी स्वतंत्र निवडणूक लढण्याची घोषणा या आधीच केली आहे. मात्र निवडणूक स्वतंत्र लढता येत नाही आणि लढ़लोच तर अपेक्षित यश येत नाही हे तुपकरांना चांगल्याच प्रकारे माहिती आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत ते मोठी राजकीय खेळी करण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. लोकसभेत तब्बल अडिच लाख मते घेणार्‍या तुपकरांसोबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची बोलणी सुरू असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली आहे. त्यामुळेच आंबेडकरांनी विधानसभेचे ११ उमेदवार जाहीर करताना, चिखली, बुलढाणाव व खामगाव मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले नाहीत, असे कळते.

तिसरी आघाडीत तयार 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कुरघोडी केली. तिसर्‍या आघाडीत बच्चू कडू, छत्रपती संभाजीराजे यांना सोबत घेतले. राज्यात नवीन राजकीय समीकरण तयार केले. वास्तविक पाहाता, तुपकर व बच्चू कडू सोबत येणार होते. परंतु, बच्चू कडू यांनी तुपकरांऐवजी शेट्टीना भिडू म्हणून पसंती दिली. त्यामुळे तिसर्‍या आघाडीत न जाता तुपकरांनी आंबेडकरांसोबत जाणे पसंत केले असल्याचे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे. त्यादृष्टीने तुपकर हे बुलढाण्यातून आंबेडकरांच्या आघाडीचे उमेदवार असू शकतात, असेही राजकीय सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

परिवर्तन महाशक्ती

शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी किंवा महायुतीसोबत न जाता तिसरी आघाडी तयार केली आहे. त्यात, सुरूवातीला रविकांत तुपकरांसोबत येण्याची शक्यता असलेले बच्चू कडू हे शेट्टींसोबत गेले. शिवाय, त्यांच्यासोबत छत्रपती संभाजीराजे भोसले हेदेखील आहेत. त्यादृष्टीने पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये पत्रकार परिषद घेत शेट्टी यांनी परिवर्तन महाशक्ती या तिसर्‍या आघाडीची घोषणा नुकतीच केली. या तिसर्‍या आघाडीत सामील होण्यास प्रकाश आंबेडकर यांनी मात्र नकार दिला आहे. त्यानंतर चौथ्या आघाडीसाठी आंबेडकर व तुपकर यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यादृष्टीने या दोघांत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती हाती आली आहे.

बुलढाणा, खामगाव व चिखली असे तीन विधानसभा मतदारसंघ रविकांत तुपकर यांच्यासाठी सोयीस्कर ठरतील, असा प्रकाश आंबेडकर यांचा कयास आहे. कारण, २०१९ च्या निवडणुकीत बुलढाण्यातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विजयराज शिंदे यांनी तब्बल ४१ हजार ७१० मते घेतली होती, तर २०२४ च्या लोकसभा मतदारसंघातून तुपकर हे या मतदारसंघातून जवळपास ३९ हजारांपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर राहिले आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांची साथ मिळाली तर या मतदारसंघातून रविकांत तुपकर मोठ्या फरकाने तिहेरी लढतीत हमखास निवडून येतील, असा अंदाज वर्तविला जात आहे. दलित आणि ओबीसी हा वंचित आघाडीचा मतदार मानला जातो. तुपकर सोबत आल्यास शेतकर्‍यांचे मतदान वंचित आघाडीकडे वळू शकते.

Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांची सरकार सोबतची बैठक सकारात्मक

अपक्ष असताना अडीच लाख मते 

रविकांत तुपकर यांनी लोकसभा निवडणुकीत अपक्ष लढूनदेखील तब्बल अडीच लाख मते घेतली. त्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात मत विभाजन झाले. त्याचा फटका महाआघाडीच्या उमेदवाराला बसला हे दिसून आले. त्यामुळे शिवसेना (ठाकरे) पक्षाचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर हे फार कमी फरकाने पराभूत झाले. बुलढाणा लोकसभा ंमतदारसंघातून शिंदे गटाचे उमेदवार प्रतापराव जाधव यांना साडेतीन लाख, शिवसेना (ठाकरे) उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांना ३ लाख २० हजार ३८८ मते पडली आहेत. प्रा.खेडेकर २९ हजार ४७९ मतांनी पराभूत झाले आहेत. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील सिंदखेडराजा, बुलढाणा, चिखली व मेहकर या विधानसभा मतदारसंघातून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना मोठे मताधिक्य मिळालेले आहे. त्यामुळे तुपकरांना आंबेडकरांची साथ मिळाली तर मेहकर, बुलढाणा, सिंदखेडराजा या मतदारसंघासह विदर्भ व मराठवाड्यातील अनेक मतदारसंघातील राजकीय समिकरणे बदलणार असल्याचे राजकीय धुरीणांचे मत आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!