Mumbai terrorist Attack : 26/11 ला मुंबईत भ्याड हल्ला झाला. त्या हल्ल्यात पोलिस अधिकारी हेमंत करकरे आणि साळसकर यांना लागलेल्या बुलेट्स कसाबच्या नव्हत्या. हे सत्य न्यायालयापासून लपविण्यात आले,असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड प्रकाश आंबेडकर यांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत. करकरे आणि साळसकर यांच्या शरीरातील बुलेट्स कसाब आणि अबू इस्माईलच्या बंदुकीतील नाहीत, तर मग कोणाच्या बंदुकीतील होत्या?अॅड.उज्ज्वल निकम यांनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत केली.
या विषयाला अनुसरून त्यांनी उज्ज्वल निकम यांना काही प्रश्न विचारले आहेत. ते म्हणाले, मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्यात पाकिस्तानने रसद पुरवली हे खरे आहे. पण या घटनेआड कोणीतरी दुसरी घटना घडवून आणली आहे का ? याचा खुलासा निकम यांनी केलाच पाहिजे. पोलिस अधिकाऱ्यांच्या शरीरातील बुलेट्स ज्यावेळी मॅच झाल्या नव्हत्या, तेव्हा त्या बुलेट्स कोणाच्या बंदुकीतील होत्या ? कसाबच्या शस्त्रातील होत्या ? पोलिसांच्या शस्त्रातील होत्या की, पोलिस न वापरणाऱ्या शस्त्रातील होत्या? या विषयाबाबत निकम यांनी अतिरिक्त चौकशी करायला हवी होती. ती त्यांनी का केली नाही? ही बाब त्यांनी कोर्टाच्या नजरेस का आणून दिली नाही? यासर्व प्रश्नांचा खुलासा निकम करतील अशी अपेक्षा करतो.
संशय दूर झालाच पाहिजे…
कोणाला माझे पुतळे जाळायचे असतील तर त्यांनी हमखास जाळावेत. त्यांनी मला देशद्रोही घोषित केले तरी चालेल. मला फरक पडत नाही. पण, जे आरोपी आहेत त्यांच्या शस्त्रातील बुलेट्स नव्हत्या, तर मग बुलेट्स कोणत्या शस्त्रातील आहेत. याची चौकशी अधिकाऱ्यांमार्फत किंवा कोर्टामार्फत का करण्यात आली नाही? या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर निकम यांनी सर्व प्रथम द्यावं. असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.