महाराष्ट्र

Vanchit Bahujan Aghadi : आता चौथ्या आघाडीची चर्चा!

Assembly Election : आंबेडकर आणि तुपकर एकत्र येणार?

Ravikant Tupkar : विधानसभा निवडणुकीपूर्वी तिसऱ्या आघाडीमुळे एक नवीन भर पडली. आता महायुती, महाविकास आघाडी, तिसरी आघाडी आणि स्वतंत्र उमेदवार असेच समीकरण असेल. हे निश्चित होते. मात्र तिसऱ्या आघाडीत येण्यास ज्यांनी नकार दिला ते लोक आता एकत्र आले आहेत. त्यांनी नवे समीकरण थाटले आहे. त्यामुळे राज्यात आता चौथ्या आघाडीची तयारी सुरू झाली आहे. निवडणुकीनंतर महाविकास आघाडी किंवा महायुती यांच्यापैकी ज्यांना बहुमत असेल, त्याबाजुने नव्या आघाड्यांचा कल असेल, असे दिसत आहे.

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश आंबेडकर आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर दोघेही तिसऱ्या आघाडीत नाहीत. तुपकर आणि आंबेडकरांनी नकार दिला. त्यामुळे दोघांनी एकत्र येऊन चौथ्या समीकरणाची तयारी सुरू केली आहे.

परिवर्तन महाशक्तीची चर्चा

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी असा पर्याय असतानाच तिसऱ्या आघाडीचाही पर्याय पुढे आला. ‘परिवर्तन महाशक्ती’च्या छताखाली सारे एकत्र आले. स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी, स्वराज्य पक्षाचे प्रमुख युवराज संभाजीराजे, प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू, महाराष्ट्र राष्ट्र समितीचे शंकरअण्णा धोंडगे, स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप, नारायण अंकुशे यांचा यात समावेश आहे. अलीकडेच परिवर्तन महाशक्तीची बैठक झाली.

आता राज्यात आणखी एक पर्याय पुढे येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वंचित बहुजन आघाडी आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यात ही आघाडी होण्याची शक्यता आहे. तशी चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती. अपक्ष असूनही या निवडणुकीत मतदारांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला होता. अडीच लाखांवर तुपकरांना मतदान झाले होते. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा, बुलढाणा, मेहकर आणि चिखली या मतदारसंघात तुपकर यांना चांगली मते मिळाली होती. तुपकरांशिवाय तिसरी आघाडी अपूर्ण असल्याचं मत आंबेडकर यांनी व्यक्त केलं होते. पण रविकांत तुपकर तिसऱ्या आघाडीत जाणार नसल्याचं त्यांनी अकोल्यात स्पष्ट केलं होतं.

Parinay Fuke : विकासाबाबत साकोली मागास 

पश्चिम विदर्भात तुपकर यांचा प्रभाव!

रविकांत तुपकर हे बुलढाणा जिल्ह्यातील आहेत. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना घेऊन नेहमी रविकांत तुपकर हे आक्रमक पध्दतीने आंदोलन करतात. शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी त्यांची महत्त्वाची भूमीका राहिला आहे. लोकसभा निवडणुकीपासून ते राजू शेट्टी यांच्यापासून दूर गेले. त्यांनी स्वतःच्या बळावर बुलढाणा लोकसभा निवडणूक लढवली. त्यांना चांगली मतं मिळाली. शेतकऱ्यांचा नेता म्हणून बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळसह एकूणच पश्चिम विदर्भात त्यांची चांगली पकड आहे. त्यामुळे याचा वंचितला मोठा फायदा होऊ शकतो. या जिल्ह्यात वंचितचा देखील मोठा प्रभाव आहे. अकोला जिल्हा हा वंचितचा गड मानला जातो.

प्राथमिक चर्चा

प्रकाश आंबेडकर आणि तुपकर यांच्यातील संभाव्य राजकीय मैत्रीसंदर्भात प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. मात्र अद्यापही रविकांत तुपकर आणि प्रकाश आंबेडकरांची प्रत्यक्ष भेट झाली नाही. त्यांच्यात चर्चाही झाली नसल्याची माहिती आहे. परिणामी दोन्ही नेत्यांच्या प्रस्तावित आघाडीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!