India Alliance : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी लेटरबॉम्ब टाकत महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत. पराभव स्वीकार करत प्रकाश आंबेडकरांनी हे आरोप केले आहेत. महाविकास आघाडीतील काही घटकांनी जाणीवपूर्वक वंचित बहुजन आघाडीला सामावून घेतलं नसल्याचा आरोपही आंबेडकरांनी केला. वंचित बहुजन आघाडीचा झालेला अपमान आणि महाविकास आघाडीकडून वंचितला मिळालेली संकुचित वागणूक हे मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी कमी पडल्याचंही आंबेडकर म्हणालेत. त्यांनी यासंदर्भात एक पत्र एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत मविआचा समाचार घेतला आहे.
लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. अशात, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. एक पत्र पोस्ट करीत त्यांनी अनेक प्रश्न विचारले आहेत. तर महाविकास आघाडीवर आरोप केले आहेत. ‘आम्ही जनतेचा जनादेश नम्रपणे स्वीकारला आहे. आम्ही निराश झालो आहोत पण, आशा सोडलेली नाही. आम्ही आत्मपरीक्षण करून वंचित बहुजन आघाडीच्या रणनीतीतील त्रुटी तपासून आवश्यक त्या उपाययोजना जरूर करू. मतदारांबद्दल आमची कोणतीही तक्रार नाही. असे आंबेडकर म्हणाले.
महाविकास आघाडीतील काही घटकांनी जाणीवपूर्वक वंचित बहुजन आघाडीला आघाडीत सामावून घेतले नसल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. बैठकांसाठी आमंत्रित करण्यात आले होते. परंतु, ते सर्व मीडिया आणि मतदारांसाठी होते. आम्ही त्यांच्या जाळ्यात अडकलो आणि मतदारांना आमचा झालेला अपमान आणि आमच्या पक्षाप्रती महाविकास आघाडीची संकुचित वृत्ती पटवून देण्यात सपशेल अपयशी ठरलो. असल्याचं पत्रात म्हटलं आहे.
मतदारांचा केला वापर
महाविकास आघाडीने केवळ बहुजनांच्या मताचा वापर केल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएसोबत लढण्याचा अजेंडा नसल्याचे इंडिया आघाडीच्या लक्षात आल्यावर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वापर केला. ‘संविधान वाचविण्याचा लढा’ आमच्या तत्त्वज्ञानातून आणि मोहिमेतून त्यांनी घेतला. इंडिया आघाडीने दलित, आदिवासी, ओबीसी आणि मुस्लिम हे भाजपशी लढण्यास सक्षम विरोधक असल्याचे मतदारांना पटवून दिले. मात्र, प्रत्यक्षात या राजकीय पक्षांना केवळ स्वत:ला वाचवायचे होते आणि यासाठी त्यांनी बहुजनांच्या मतांचा वापर केला. असल्याचा आरोपही आंबेडकर यांनी केला.
तर वंचित बहुजन आघाडी स्थापन करायची गरज नसती!
आंबेडकर म्हणाले, मतदारांबद्दल आमची कोणतीही तक्रार नाही. त्यांना सांगितले गेले की, फक्त आणि फक्त इंडिया आघाडीला मतदान केल्यास भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएपासून देश वाचवू शकतो. परंतु, तरीही एनडीए बहुमत मिळवण्यात यशस्वी झाला. इंडिया आघाडीतील पक्षांचा ढासळणारा वाडा वाचवण्यासाठी आणि पुन्हा नव्याने उभारण्यासाठी बहुजन मतदारांच्या स्वतंत्र नेतृत्वाचा स्वत:चा बालेकिल्ला पाडायला भाग पाडण्यात आले. या पक्षांना संविधान वाचवायचे असते, सामाजिक दृष्ट्या वंचित व शोषितांसाठी लढायचे असते, तर वंचित बहुजन आघाडी स्थापन करण्याची गरजच पडली नसती. असेही आंबेडकरांनी म्हटले आहे. इंडिया आघाडीतील काही पक्ष सोडले तर संविधानाच्या समर्थनार्थ, वैदिकवादाविरोधात कोणीही भूमिका घेतलेली नसल्याचं त्यांनी म्हटले आहे.
Akola Congress : निवडणूक हरले तरी पाटलांना मिळणार मोठी जबाबदारी
लढलो स्वतःच्या ताकदीवर
महाविकास आघाडीच्या शेवटच्या बैठकीत महाविकास आघाडीने 2 जागा वंचित बहुजन आघाडीला देत असल्याचे सांगितले. त्यातील एक जागा अकोला आणि दुसरी जागा उत्तर मुंबई होती. महाविकास आघाडीचे नेते माध्यमाशी बोलताना या जागांचा आकडा 4 ते 6 सांगायचे आणि ते ज्या जागांचा उल्लेख करायचे त्यात आम्हाला 2019 मधे एक लाखाच्या वर मतदान मिळालेली एकही जागा नसायची. यावरून लक्षात आलेली गोष्ट म्हणजे उत्तर मुंबईची न जिंकता येणारी जागा होती, तर अकोल्याच्या जागेत कधीही गेम होऊ शकतो. इंडिया आघाडी बरोबर जाऊन पडणे आणि स्वत:च्या ताकदीवर लढणे यात फरक आहे. स्वत:च्या ताकदीवर लढून टिकण्याचा मार्ग कायम राहतो आणि म्हणून आम्ही टिकण्याचा मार्ग स्वीकारला.
महाविकास आघाडीने एवढे अपमानित करुनही आम्ही सहभागी होण्यासाठी पुरेपुर प्रयत्न केला. यासाठीचे पहिले पाऊलही वंचित बहुजन आघाडीनेच टाकले. जे गेले अनेक महिने दुर्लक्षित करण्यात आले. एक गोष्ट आम्ही अधोरेखित करतो की, महाविकास आघाडीने काही ठराविक बैठकींना आम्हाला बोलावले. बाकीच्या बैठकांना बोलावले नसल्याचं म्हटलं आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला थोडा वेळ आहे. येत्या काही महिन्यांत मतदारांशी अधिक मजबूत नाते निर्माण करण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत अधिक संवाद करू असेही आंबेडकर यांनी म्हटलं आहे.