अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघातून तब्बल चार वेळा आमदार राहिलेल्या बच्चू कडूंना यावेळी पराभवाचे तोंड बघावे लागले. या पराभवाने ते अजिबात खचलेले नाहीत. तर पुढील राजकारणाची रुपरेषा ठरवण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. यासाठी ते आता जनतेच्याच दरबारात गेलेले आहेत.
सत्तेत की सत्तेबाहेर, हा सवाल बच्चू कडू यांनी जनतेलाच विचारला आहे. यानंतर उद्या (29 नोव्हेंबर) ते मुंबईत बैठक घेणार आहेत. तर सोमवारी (2 डिसेंबर) मुंबईत कार्यकर्त्यांचे अधिवेशन घेणार आहेत. या अधिवेशानत कार्यकर्त्यांशी चर्चा करून ते ‘प्रहार’ची पुढील दिशा ठरवणार आहेत. यावेळी बच्चू कडू प्रहारसह महाशक्ती परिवर्तन आघाडीकडून निवडणूक लढले होते. या आघाडीला यश आले नाही.
‘ज्यादा चर्चे हमारी हार के है’
बच्चू कडू यांचा पराभव राणा दाम्पत्याने केल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशात त्यांनी राणांमध्ये इतकी क्षमता नाही. त्यांनी उगाच माझ्या पराभवाचे श्रेय लाटू नये, असे म्हणत त्यांनी राणांना लक्ष्य केले. अनेक कोलांटऊड्या मारून निवडणूक लढणे वेगळे आणि स्वतःच्या बळावर अपक्ष म्हणून लढणे वेगळे. राणा दाम्पत्यात हिंमत असेल तर माझ्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हानही कडू यांनी दिले आहे. ‘तुम्हारी जीत से ज्यादा चर्चे हमारी हार के है’, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
एकनाथ शिंदेंमुळेच भाजप सत्तेत
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली नसती, तर भाजप कधीही सत्तेत आली नसती. आणि आज भाजपनेच शिंदेंना मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर फेकले आहे. त्यांनी ‘भाजप पक्षश्रेष्ठीं घेतील, तो निर्णय मान्य असेल’, हे जे वक्तव्य केले. ते स्वतःहून केलेले नसून दबावातून केले असल्याचा दावाही बच्चू कडू यांनी केला आहे. भाजपने आता एकनाथ शिंदे यांच्याकडे दुर्लक्ष करू नये. पण ‘गरज सरो अन् वैद्य मरो’, असं भाजपचं काम असल्याचा हल्लाबोलही बच्चू कडू यांनी केला.
Assembly Election : खर्च सादर न केल्यास निवडणूक लढण्यावर बंदी
सेवा हरणार नाही
या निवडणुकीत जात आणि धर्म जिंकला आणि सेवा हरली. पण सेवा हरू शकत नाही. आम्ही पुन्हा लोकांच्या सेवेत लागू. निवडणुकीत हार जीत होतच असते. पण आम्ही घेतलेलं सेवेचं व्रत सोडणार नाही. मागील सरकारमध्येही आम्ही केवळ दिव्यांग विभाग मागितला होता. महसूल, नगररचना, गृह, ऊर्जा, अशा खात्यांसाठी जेथे शर्यत असते. तेथे आम्ही दिव्यांगांची सेवा करण्यासाठी तो विभाग मागितला. ही मागणी म्हणजे आमच्या सेवाभावाची पावती आहे, असेही बच्चू कडू यांनी सांगितले. जातीधर्माचे झेंडे कितीही फडकवले, तरी सेवा हरणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.