Donate Blood Save Life : एकीकडे उन्हाचा तडाखा तर दुसरीकडे राज्यात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळे रक्तदान शिबिरांची संख्या घटल्याने शहरातील रक्तपेढ्यांमधील रक्तसाठा निम्म्यावर आला आहे. परिणामी, रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यासाठी रक्तपेढ्यांना शोधाशोध करावी लागत आहे. काही रक्तपेढ्यांमध्ये पाच दिवस, तर काही ठिकाणी एका आठवड्याचा रक्तसाठा शिल्लक आहे. अशातच आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने पुढाकार घेतला आहे. प्रहार संघटना राज्यभर रक्तदानाची मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांत उन्हाची तीव्रता अधिक असल्याने अनेक जण रक्तदान करीत नाहीत. महाविद्यालयांना सुट्ट्या असतात. अनेक जण बाहेरगावी जातात. त्यामुळे शिबिरांची संख्याही कमी होते. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे नियोजित शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण जास्त असते. यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात रक्ताची टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण होते. आमदार बच्चू कडू आणि त्यांची संघटना रक्तदानासाठी पुढाकार घेत असते. लोकसभा निवडणुकीतही आमदार बच्चू कडू यांनी आधी रक्तदान आणि मग मतदान केले होते.
आता रक्तपेढ्या भराव्या लागणार
राज्यातील लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता संपली आहे. दुसरीकडे राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. आपण मतदान करून जशा मतपेट्या भरण्याचे काम केले, तसेच आता आपल्याला रक्तदान करून रक्तपेढ्या भरण्याचे काम करावे लागणार आहे. ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे. मतदान हे जसे आपले लोकशाही कर्तव्य होते, तसेच रक्तदान हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. त्यासाठी प्रहारच्या वतीने 31 मे ते 26 जून दरम्यान राज्यभर रक्तदान मोहीम पार पडणार आहे. 31 मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मोहिमेची सुरुवात होईल. 6 जूनला शिवराज्याभिषेक दिनी मुंबईमध्ये महारक्तदान, 26 जूनला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीदिनी मोहिमेची सांगता होणार आहे.
दरम्यानच्या काळातही गावपातळीवर किंवा रक्तपेढ्यांमध्ये वैयक्तिक पातळीवर देखील रक्तदान करू शकता. सर्वांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. या मोहिमेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला आकर्षक बक्षीस व सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. असे देखील प्रहार संघटनेने जाहीर केले आहे.
बच्चू कडू आणि रक्तदानाचं नातं!
बच्चू कडू आणि रक्तदानाचं नातं काही नवं नाही. बच्चू कडू यांच्या गावात मित्रांसोबत कबड्डी खेळताना त्यांच्या मित्राला रक्ताची उलटी झाली. बच्चू कडू आणि त्यांच्या मित्रांनी त्याला अमरावतीला नेले. पुढील उपचारासाठी त्याला मुंबईला न्यावे लागणार होते. पैसे कुणाकडेही नव्हते. त्यावेळी बच्चू कडू यांनी घरचा कापूस विकला आणि कबड्डीच्या स्पर्धा गाजवून जे पैसे गोळा केले तेही सोबत होतेच. याच बळावर मुले मुंबईला गेली. तेथे हॉस्पिटल शोधून काढले. मित्राला भरती केल्यानंतर त्याला रक्ताची गरज होती. पण रक्तदान करण्यासाठी बच्चू कडू यांच वजन कमी होतं. तर या पठ्ठ्याने 50 किलो वजन भरत नाही, म्हणून खिशात दगडं ठेवली अन् रक्तदान केले. हे ऑपरेशन यशस्वी करून बच्चू जेव्हा आपल्या मित्रांसह गावात परतला. तेव्हा 20 वर्षांचा हा पोरगा गावाचा हिरो झाला होता. तेव्हापासून बच्चू कडू यांनी रक्तदानाच्या मोहिमेत नेहमीच पुढाकार घेतला आहे.