महाराष्ट्र

Lok Sabha Election :- ‘भेल’पुरी करणारा तो मी नव्हे, पुन्हा भिडले पटेल-पटोले !

Praful Patel : खासदार प्रफुल पटेल यांनी जाहिर भाषणास सुरुवात करताच भेल प्रकल्पाचा मुद्दा उकरुन काढला

Bhandara – Gondia Constituency : यंदाचा भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा मुख्य मुद्दा ‘भेल’ प्रकल्पावर केंद्रित झाला आहे. याची प्रचिती काल महायुती आणि महाविकास आघाडिच्या नेत्यांच्या शक्तिप्रदर्शनात पहायला मिळाली. भेलचा प्रकल्प पूर्ण न होण्यास कोण जबाबदार यावरून पटेल-पटोले पुन्हा भिडले असताना भंडाराकरांनी पुन्हा एकदा पाहिले आहे. त्यामुळे भेल ची ‘भेल’पुरी करण्यास आपण जबाबदार नाही, अशी भूमिका हे दोन्ही नेते आता घेताना दिसत आहेत.

महाविकास आघाडी आणि महायुतिच्या उमेदवारांनी नामांकन अर्ज भरले. दरम्यान दोन्ही आघाड्यांच्या जाहिर सभा झाल्या. यावेळी महायुतीचे नेते अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी जाहिर भाषणास सुरुवात करताच भेल प्रकल्पाचा मुद्दा उकरुन काढला. पुढे बोलाताना पटेल म्हणाले, या मतदार संघात उद्योग उभारणीसाठी प्रयत्न केले. भेल प्रकल्प आणला. मात्र आम्हाला घरी बसविण्याच्या नादात ‘त्यांना’ जवळ केले.

‘भेल’ची भेलपुरी करून नंतर तेही पळून गेले, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी नाना पटोले यांचे नाव न घेता केली. महायुतीचे उमेदवार भाजपचे सुनील मेंढे यांचे नामांकन दाखल केल्यावर मुस्लिम लायब्ररी चौकात जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासह महायुतीमधील पक्षांची नेते मंडळी, माजी आमदार प्रामुख्याने उपस्थित होते.

दूसरीकडे पटेलांच्या आरोपावर शांत बसतील ते नाना पटोले कसले? त्यांनीही महाविकास आघाडीच्या व्यासपीठावरुन भेल प्रकल्पाची ‘भेलपुरी’ कोणी केला, याचा पाढाच वाचला. नाना म्हणाले उद्योग नसलेल्या या जिल्ह्यात भेलसारखा प्रकल्प आणला. मात्र नंतर राज्यसभा सदस्यपदावर जाऊनही हा प्रकल्प कोणी अडवून ठेवला, हे सर्व जनता जाणते. आता तर खासगीकरणात या प्रकल्पाची भेलपुरी कोण बनवत आहे, हे सांगण्याची वेळ आमच्यावर आणू नका, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

महाआघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांचे नामांकन भरल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, या जिल्ह्यात व्हिडीओकॉन प्रकल्पाची घोषणा केली होती. तो कुठे गेला, हे त्यांनी सांगावे. देवाडाला उद्योगाच्या नावाखाली प्रदूषणाच्या खाईत लोटणाऱ्यांनी तेथील नागरिकांच्या आरोग्याबद्दल आधी बोलावे, असा खरमरीत समाचार नानांनी घेतला आहे.

आधीच भंडारा गोंदियाचे मतदार जिल्ह्यात कोणताही रोजगार निर्मिती करेल, असा मोठा उद्योग नसल्याने नाराज आहेत. त्यातही भेल सारखा उद्योग भंडारा जिल्ह्यात येऊन बंद पडल्याने रोजगाराच्या शोधात असलेले मतदार जिल्ह्यातील नेत्यांवर नाराज आहे त्या नाराजीचा वचपा येत्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला भोगाव लागू नये म्हणून जिल्ह्यातील हे मोठे नेते तो मी नव्हेच! अशी बदावली करत असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!