Mahayuti : महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ शपथविधीनंतर राज्य आणि राष्ट्रीय राजकारणात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भंडारा-गोंदियातील महायुतीला मिळालेल्या यशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांना केंद्रात मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा जोर धरत आहे. प्रफुल पटेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांच्या संघटन कौशल्याने महायुतीला मोठा फायदा झाला आहे.
भंडारा-गोंदियात महायुतीने यश मिळवले, ते प्रफुल पटेल यांच्या प्रभावी नेतृत्वामुळेच शक्य झाले. पटेल यांनी मतदारसंघातील कार्यकर्त्यांना एकत्र आणत पक्षाची पकड मजबूत केली. त्यांच्या संघटनात्मक कौशल्याचा प्रभाव निवडणुकीत स्पष्ट दिसला. महायुतीच्या विजयात प्रफुल पटेल यांची भूमिका महत्वाची आहे. प्रफुल पटेल प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. केंद्राच्या राजकारणात त्यांची छाप आहे. त्यांच्या चांगल्या संबंधांमुळे विदर्भासाठी मोठ्या प्रकल्पांना चालना मिळण्याची शक्यता आहे. त्यांनी पक्षांतर्गत गटबाजी टाळत कार्यकर्त्यांना एकत्र आणले. त्यामुळे महायुतीची मते अधिक बळकट झाली.
केंद्रीय मंत्रीपदाची शक्यता..
भाजपसाठी अजित पवार गट महत्त्वाचा घटक ठरला आहे. त्यामुळे प्रफुल पटेल यांना दिल्लीतील मंत्रिमंडळात स्थान दिल्यास, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे स्थान महायुतीत अधिक बळकट होईल. तसेच, विदर्भातील राजकीय समीकरण महायुतीच्या बाजूने वळवण्यासही मदत होईल. पटेल यांचे नेतृत्व केवळ स्थानिकच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरही प्रभावी आहे. त्यांच्या केंद्र सरकारशी असलेल्या चांगल्या संबंधांचा विदर्भाला मोठा फायदा होईल. विदर्भातील विकास प्रकल्प, उद्योग, आणि पायाभूत सुविधांसाठी त्यांचे मंत्रिपद महत्त्वाचे ठरू शकते.
प्रफुल पटेल केंद्रीय मंत्री झाले, तर भंडारा-गोंदियाच्या विकासाला गती मिळेल. या भागातील कृषी, सिंचन आणि उद्योग क्षेत्रात प्रगती होऊ शकते. विदर्भातील रोजगार निर्मितीसाठी विशेष योजना आणण्याचा ते प्रयत्न करतील. विदर्भातील अनेक भागांचा विकास रखडला आहे. त्यामुळे पटेल यांच्या केंद्रातील सहभागामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, आणि स्थानिक विकासावर सकारात्मक परिणाम होणार आहे.
Nagpur winter session : बिनखात्याच्या मंत्र्यांवरच आटोपणार अधिवेशन!
भविष्यासाठी महत्त्वाचा टप्पा
राजकीय जाणकारांच्या मते प्रफुल पटेल यांची मंत्रिपदावर वर्णी लागल्यास महायुतीच्या आगामी निवडणुकीतील रणनीतीसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी असलेले चांगले संबंध त्यांच्या नियुक्तीसाठी फायदेशीर ठरतील. भंडारा-गोंदियातील विजय महायुतीसाठी मोठे बळ ठरले आहे. प्रफुल पटेल यांच्या प्रभावी नेतृत्वामुळेच हा विजय शक्य झाला. केंद्रीय मंत्रिपदी त्यांची नियुक्ती विदर्भ आणि महायुतीच्या राजकीय भविष्यासाठी निर्णायक ठरू शकते. त्यामुळे या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.