महाराष्ट्र

Lok Sabha Election : अकोल्यात लोक मेले तरी चालतील, पण सगळं काही इलेक्शन नंतरच; कारण..

Akola Power Failure : महावितरणच्या भंगार कारभाराचे नेत्यांना नाही सोयरसूतक

MSEDCL Political News : चटके लावणारे ऊन. पारा 43 अंश सेल्सिअसवर गेलेला. अशात वाढलेला प्रचंड उकाडा आणि वारंवार खंडीत होणारा वीज पुरवठा. अकोला शहरात ऑक्टोबर 2023 पासून सुरू असलेला हा प्रकार आता लोकांसाठी चांगलाच जीवघेणा ठरत आहे. मात्र लोक मेले तरी चालतील लोकसभा निवडणुकीचे मतदान होईपर्यंत आम्ही याकडे लक्षही देणार नाही, असाच निर्धार अकोल्यातील सर्व राजकीय पक्षांनी केलेला आहे. ‘द लोकहित’ने यामुद्द्यावर शहरातील भाजप, उद्धव ठाकरेंची शिवसेना, वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांशी संवाद साधला. सर्वांनी एकच उत्तर दिले. मतदान होऊन जाऊ द्या मग दणकेबाज आंदोलन करू.

अकोल्यातील महावितरणाचा कारभार पूर्ण भंगार झाला आहे. दस्तूरखुद्द राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस अकोल्याचे पालकमंत्री होते. मात्र सत्ताधारी नेत्यांना अकोल्यातील विजेच्या समस्येचा मुद्दा सोडविता आला नाही. त्यामुळे आता महावितरणचा कारभार सत्ताधारांची गोची करणारा आणि ऐन निवडणुकीच्या वेळी मतदारांचा संताप वाढविणारा ठरत आहे. ऐन मतदानाच्या 72 तासांपूर्वी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात बुधवारी (ता. 12) तब्बल 12 वेळा वीज पुरवठा खंडीत झाला.

Lok Sabha Election : दुसऱ्या टप्प्यातील प्रचार थांबला

नेहमीचे रडगाणे

लोकसभा निवडणुकीच्या काळात रमजान ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, महावीर जयंती आणि हनुमान जन्मोत्सव असे उत्सव पार पडले. हे सर्व उत्सव महावितरणच्या कारभारामुळे अंधारात गेले.संपूर्ण रमजान महिना अकोला पश्चिम मतदारसंघातील मुस्लिम वस्त्या अंधारात बुडाल्या होत्या. डॉ. आंबेडकर जयंतीच्या दिवशी भीमनगरात वीज नव्हती. श्रीराम नवमीचा दिवसही महावितरणने असाच अंधकारमय केला. महावीरांनाही महावितरणने फटका दिला. हनुमान जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला विदर्भात एकमेव असलेले काळा मारोती मंदिर अंधारात बुडाले होते.

पाठकांच्या दौऱ्याचा फायदा नाही!

विदर्भातील भाजपचे एकेकाळचे प्रवक्ते विश्वास पाठक आता वीज पुरवठा करणाऱ्या तीनही कंपन्यांचे संचालक आहेत. अमित शाह यांच्या सभेच्या दिवशी विश्वास पाठक हे अकोल्यात होते. भाजपच्या व्यासपीठावर होते. परंतु भाजपच्या एकाही नेत्याला अकोलेकरांची व्यथा त्यांच्यापुढे मांडावीशी वाटली नाही, याचे आश्चर्य आहे. यासंदर्भात भाजपच्या काही नेत्यांशी ‘द लोकहित’ने बुधवारी (ता. 24) संपर्क केला. मात्र तीन आमदारांनी फोन उचलले नाही. उर्वरित नेत्यांनी सध्या प्रचार सुरू असल्याचे नमूद केले.

शिवसेना बिझी

अकोलेकरांना जराही त्रास झाला तरी आंदोलन करणारी उद्धव ठाकरे यांची शिवसेनाही सध्या विजेच्या मुद्द्यावर गप्प आहे. शिवसेनेचे नेते राजेश मिश्रा यांनी सध्या सगळेच प्रचारात व्यस्त असल्याचे कारण दिले. जनतेच्या प्रश्नांचे काय असे सांगितल्यानंतर त्यांनी एकदा मतदान होऊन जाऊ द्या, मग महावितरणला आडव्या हाताने घेतो असे सांगितले.

वंचित’ गंभीर

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रा. धैर्यवर्धन पुंडकर म्हणाले गेल्या अनेक दिवसांपासून या विषयावर येणाऱ्या पोस्ट वाचत आहे. हा प्रश्न लावून धरला ही चांगली बाब आहे. यासंदर्भात तातडीने अकोला शहरातील पदाधिकाऱ्यांशी बोलून तातडीने महावितरणच्या अभियंत्यांना जाब विचारू. निवडणूक असली तरी काय करता येईल ते पाहू.

भाजपने केली होती सूचना

अकोल्यातील वीज पुरवठ्याच्या मुद्द्यावर भाजपकडून यापूर्वी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आली होती. अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावकर यांनी यासंदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांना सूचना दिली होती, असे प्रसिद्धीपत्रक भाजपकडून काढण्यात आले होते. उत्सवांचा काळ असल्याने नागरिकांची गैरसोय होणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. मात्र त्यानंतरही महावितरणचा कारभार सुधारलेला दिसत नाही.

काँग्रेसचा ‘पंजा’ खिशात

शहरातील विकासाच्या मुद्द्यावर व जनतेच्या प्रश्नांबाबत काँग्रेस अगदीच बॅकफुटवर आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या काँग्रेसने आतापर्यंत लोकांच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यांवर फारच कमी आंदोलन केले आहे. अकोल्यात ठाकरेंची शिवसेना शेतकरी, स्वाती इंडस्ट्री, उड्डाणपूल, अंडरपास अशा मुद्द्यांवर आंदोलन करीत होती. अशावेळी काँग्रेसनेते आपला ‘पंजा’ खिशात घालून गंमत पाहात होते. आजही त्यांची भूमिका फारशी बदललेली दिसत नाही.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!