Nagpur BJP : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मिळालेल्या यशाचे श्रेय भारतीय जनता पार्टीने देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. नागपूर येथील धरमपेठ भागात असलेल्या फडणवीस यांच्या घराबाहेर समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर फलकबाजी केली आहे. या फलकांवर महाविजयाचे शिल्पकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांना श्रेय देण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीस यंदा चाणक्य म्हणून संबोधले जाते. महाविकास आघाडी सरकारमध्ये फूट पाडत सत्ता काबीज करण्यात भाजपने यश मिळवलं. यामागेही देवेंद्र फडणवीस हेच होते.
महाविकास आघाडीने मोठ्या प्रमाणावर प्रचार केल्यानंतरही विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळाले आहे. त्यामुळे भाजपला सर्वाधिक जागा मिळवता आल्या. महायुतीचे संख्या बळ आता 200 पेक्षा अधिक गेले आहे. त्यामुळे सरकार स्थापन करण्यापासून महायुतीला कोणीही रोखू शकत नाही. या परिस्थितीत देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री पद निश्चित झाले आहे. त्याची औपचारिक घोषणा तेवढी शिल्लक असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे.
मोठे शक्ती प्रदर्शन
निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर नागपूर देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर भाजपकडून मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. संपूर्ण विदर्भातही फडणवीस यांच्या विजयाचा आनंद उत्सव साजरा करण्यात आला. फडणवीस यांच्या समर्थकांची संख्या विदर्भामध्ये मोठी आहे. विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यात फडणवीस यांनी आपले स्वतंत्र असे नेटवर्क तयार केले आहे. पश्चिम विदर्भात संजय कुटे, आकाश फुंडकर, रणधीर सावरकर, रवी राणा हे फडणवीस यांचे समर्थक आहेत.
Sudhir Mungantiwar: मूल येथील पॉलिटेक्निक कॉलेजसाठी सरसावले मुनगंटीवार
वर्धा जिल्ह्यामध्ये सुमित वानखडे यांना आमदार करत या भागातही फडणवीस यांनी पकड मजबूत केली आहे. नागपूर आणि पूर्व विदर्भामध्ये प्रवीण दटके, परिणय फुके, संदीप जोशी यांच्यासह अनेक नेते फडणवीस यांच्या गटातील आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत. त्यामुळे सहाजिकच फडणवीस हेच मुख्यमंत्री झाले पाहिजे, अशी सगळ्यांची इच्छा आहे. संख्याबळानुसार महायुतीमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचा होईल यात दुमत नाही. परंतु फडणवीस यांच्या व्यतिरिक्त दुसरे मुख्यमंत्री भाजपने देऊ नये अशी भावना व्यक्त होत आहे.
देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास त्याचा मोठा फायदा विदर्भाला मिळणार आहे. त्यातल्या त्यात नागपूर शहराचा विकास आणखी वेगाने होईल असे सांगण्यात येत आहे. मात्र यंदाच्या कारकिर्दीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी विकासाची ही गंगा पूर्व आणि पश्चिम विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये प्रवाहित करावी, अशी मागणी देखील नागरिकांकडून होत आहे. पश्चिम विदर्भातील बुलढाणा, वाशिम, यवतमाळ आणि अकोला हे जिल्हे अद्यापही विकासाच्या बाबतीत मागे आहेत. या भागामध्ये झपाट्याने विकास व्हावा अशी देखील नागरिकांची अपेक्षा आहे.