Ek Akolekar : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी अकोल्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अकोल्यात काँग्रेसच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात येत आहे. बॅनरबाजी नेमकं कोण करतंय, याची चर्चा रंगली आहे. आता पुन्हा काँग्रेसच्या विरोधात बॅनर लावण्यात आले आहेत. हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर अकोल्यात काँग्रेस विरोधात ‘एक अकोलेकर’ नावाने बॅनर लागले आहेत.
निवडणुकीचा बिगुल
आगामी विधानसभा निवडणुकीचा बिगुल केव्हाही वाजण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. महायुतीतील (Mahayuti) आणि महाविकास आघाडीतील घटकपक्षाकडून वेगवेगळ्या मतदारसंघावर दावे- प्रतिदावे करण्यात येत आहेत. अकोला जिल्ह्यातही आघाडी आणि युतीत दावेदारी वरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातील इच्छुकांकडून दावेदारी केली जात आहे.
तीन मतदारसंघांवर दावा
काँग्रेसकडून अकोला जिल्ह्यातील तीन मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे (Shiv Sena) गटाकडूनही तीन मतदारसंघांची मागणी आहे. कुणाला कोणता मतदारसंघ दिला जाईल, यावरून मोठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत मनोबल वाढलेल्या काँग्रेसला (Congress) जिल्ह्यात अच्छे दिन आल्याची चर्चा सुरू आहे. अशातच अकोला शहरात काँग्रेसविरोधात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात येत आहे. नेमकं बॅनर लावतय तरी कोण? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. काहींना याचे उत्तर ठाऊक असेलही. मात्र या बॅनरवरून सध्या चर्चा होत आहे.
अकोल्यात सतत काँग्रेस विरोधात वातावरण निर्माण करण्याचं काम काही दिवसांपासून सुरू आहे. काँग्रेसकडून याबाबत आरोप होत आहेत. सर्वप्रथम आघाडीचे मित्र पक्षाचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी काँग्रेसला विधानसभेसाठी अकोला पश्चिममधून जागा न देण्याचे खुले आव्हान दिले होते. त्यानंतर काँग्रेस विरोधात या ठिकाणी ‘एक अकोलेकर’च्या नावाने बॅनरबाजी करण्यात सुरू झाली आहे. ही बॅनरबाजी नेमकी कुणी सुरू केली आहे, कशासासाठी यावर तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.
तक्रार चौकशीत
बॅनरबाजीची तक्रारही काँग्रेसकडून करण्यात आली. काही दिवसानंतर पुन्हा काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नावाने बॅनरबाजी करण्यात आली. यातून काँग्रेसला काही प्रश्न विचारण्यात आले होते. आता पुन्हा हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसचा झालेल्या पराभवावर बॅनरबाजी करण्यात आली आहे. काँग्रेस फक्त हारण्यासाठीच उभी राहते का, असा प्रश्न या बॅनरमध्ये आहे.
राजकीय वातावरण तापणार का?
अगदी निवडणूकीच्या तोंडावर काँग्रेसविरोधात राजकीय वातावरण तापविण्याचा हा प्रयत्न असल्याचं सांगण्यात येत आहे. हे कृत्य करणारे कोण, याचं उत्तर काँग्रेस शोधत आहे. ज्या भागात बॅनरबाजी करण्यात आली, तेथे काँग्रेस शोधमोहिम राबवित आहे. पोलिसांप्रमाणे काँग्रेसही आपल्या समर्थकांकडून सीसीटीव्ही फूटेज गोळा करीत आहे. बॅनर कोणत्या ठिकाणावरून छापण्यात आले, याचा शोधही घेतला जात आहे.