महाराष्ट्र

Chandrapur Constituency : जोरगेवारांचा चेंडू शिंदे, फडणवीस यांच्या कोर्टात

Mahayuti : काँग्रेसचा मार्ग होणार कठीण

 Assembly Election : गेल्या काही दिवसांत किशोर जोरगेवार भाजपात जाणार अशा चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहेत. चंद्रपूरमध्ये सुद्धा या चर्चा आता जोर धरायला लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जोरगेवार खरंच भाजपात जाणार का, की पुर्वानुभवाच्या आधारे ते पुन्हा अपक्ष म्हणूनच निवडणूक लढणार? याबाबतीत आता चंद्रपुरकर उत्सुक आहेत. 

किशोर जोरगेवार चंद्रपूर मतदारसंघामध्ये सर्वाधिक मत घेतअपक्ष आमदार म्हणून निवडून आलेले महाराष्ट्रातील एकमेव आमदार आहेत. दांडगा जनसंपर्क, प्रचंड जनाधार आणि त्यांचे काम या बळावर जोरगेवारांनी भारतीय जनता पार्टीचे नाना शामकुळे यांचा तब्बल 72 हजारपेक्षा अधिक मतांनी पराभव केला होता. जोरगेवार यांची सुरुवात ही शिवसेनेपासून झालेली आहे. मात्र त्यांचं नेतृत्व फुललं, बहरलं ते भारतीय जनता पार्टीमध्येच. सुधीर मुनगंटीवार यांचे अत्यंत विश्वासू जवळचे म्हणून किशोर जोरगेवार यांना भारतीय जनता पार्टीमध्ये ओळखल्या जात होतं. 

2014 मध्ये चंद्रपूर मतदारसंघ अनुसूचित जातीकरीता राखीव झाला. त्यावेळी जोरगेवारांनी भारतीय जनता पार्टीकडून (BJP) उमेदवारी मागितली. परंतु त्यावेळेस जोरगेवार यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली नाही. त्यामुळे त्यांनी शिवसेनेकडून (Shiv Sena) निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना अपयश आले. परंतु त्यांचे काम मात्र थांबले नाही. सततचा जनसंपर्क आणि लोकांच्या हाकेला धाऊन जाणारा नेता म्हणून किशोर जोरगेवार यांचे काम सतत सुरू होते. 

ऐनवेळी धोका 

2019 मधील निवडणुकीमध्ये काँग्रेसने त्यांना उमेदवारी देण्यासाठी त्यांच्या हाती एबी फॉर्म पण दिलेला होता. परंतु ऐनवेळी काँग्रेसने (Congress) त्यांना धोका दिला आणि त्यावेळेस सुद्धा जोरगेवारांनी हिंमत न हारता आपल्या सर्व सहकाऱ्यांसोबत चर्चा करत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत त्यांनी चंद्रपुरातील भाजपाचे उमेदवार नाना शामकुळे यांचा 72 हजाराहून जास्त मताने पराभव केला.

2024 मधील निवडणुकीमध्ये जोरगेवार हे पुन्हा एकदा भाजपात जाणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. परंतु खरे पाहता गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने ऐनवेळी धोका दिल्यामुळे ही चर्चा असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर्षी काँग्रेसने या विधानसभेमध्ये बौद्ध समाजाचाच उमेदवार देण्याचे निश्चित केलेले आहे. यामुळे आता महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याकडे जोरगेवार यांचा कल दिसत आहे. असे असले तरी ते एकनाथ शिंदे (Eknath Shide) यांच्या शिवसेनेचे उमेदवार राहतील की फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश करतील? हा निर्णय आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चेवर अवलंबून आहे.

चंद्रपूरमध्ये शिवसेनेचे म्हणावे तसे मजबूत संघटन नाही. पण पूर्वाश्रमीचे शिवसैनिक म्हणून जोरगेवार यांच्या रूपात उमेदवार आहे. भाजपाचे संघटन मात्र मजबूत आहे. परंतु भाजपाकडे चेहरा नाही अशी परिस्थिती आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेसकडे जोरगेवार यांच्या तोडीचा आणि लोकांच्या संपर्कात असलेला चेहराच उपलब्ध नाही.

भाजपाला मदत

लोकसभा निवडणुकीत जोरगेवार यांनी अनेक ठिकाणी भाजपला मदत केली. यात जोरगेवारांचा सहभाग निश्चितच जास्त आहे, यात शंकाच नाही. जोरगेवार आणि भाजपचे हे मनोमिलन आधी घडले असते, तर कदाचित वेगळे चित्र दिसले असते. जोरगेवारांचा ग्रामीण भागात मजबूत जनसंपर्क आहे. स्थानिक पातळीवर यंग चांदा ब्रिगेडचं असलेलं प्रचंड मोठं कार्य आणि कार्यकर्त्यांच नेटवर्क याचा फायदा निश्चितच झाला होतो. त्यामुळे जोरगेवारांच्या पक्ष प्रवेशासाठी काही नेते मनाने तयार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश होईल का? याबाबत चंद्रपूरकरांमध्ये आता औत्सुक्य वाढायला लागले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात असलेला जोरगेवारांचा चेंडू आता कोणत्या दिशेला जाईल हे लवकरच चंद्रपूरकरांना कळणार आहे. जोरगेवार यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी पुढील निवडणूक मी पक्षाच्या चिन्हावर लढवेल, असे सुतोवाच केले होते. हा पक्ष कोणता राहील हे आता लवकरच कळेल. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी काँग्रेस सहाही मतदारसंघांमध्ये आपला उमेदवार उभा करून भाजपला क्लीन स्वीप देण्याच्या मूडमध्ये असलेले सुभाष धोटे यांच्यासमोर जोरगेवारांचे आव्हान हे निश्चितच कडवे आव्हान ठरणार आहे . त्यामुळे महायुतीला आपला उमेदवार निवडून द्यायचा असल्यास सध्या किशोर जोरगेवार यांच्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे बोलल्या जात आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!