Bhandara – Gondia : निवडणुकीचा बिगुल वाजताच नेत्यांची इतर पक्षांत इनकमिंग आऊटगोईंग सुरू झाली आहे.’जिधर दम.. उधर हम !’ असाच प्रकार सध्या सुरू आहे. दरम्यान एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाताना त्या-त्या पक्षांतील निष्ठावंतांची कुचंबणा होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या सर्व घडामोडीत पक्षश्रेष्ठीकडे निष्ठावंतांच्या तक्रारींचा पाऊस पडत आहे. फोडाफोडीच्या राजकारणात कोण शत्रू अन् कोण समर्थक, काहीच कळेनासे झाले आहे.
सध्याच्या राजकारणात असे चित्र निर्माण झाल्याने आपल्याच पुढाऱ्यांचा अविश्वास निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. यामुळे निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. याचा परिणाम म्हणून की काय आगामी निवडणुकीत कुठल्याही उमेदवाराला प्रत्येक गावात तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मागील काही वर्षांपासून देश, राज्य आणि स्थानिक पातळीवरील राजकारणात आमूलाग्र बदल पाहावयास मिळत आहे. या सर्व बाबीला राजकीय पक्षामध्ये सुरू सुरू असलेला सत्ता संघर्षाची किनार लागली आहे.
अनेकांनी आपापल्या पक्षासोबत दगाफटका करून पक्ष बदलाला खतपाणी घालण्याचे काम केले. यामुळे एक प्रकारे हवाच निर्माण झाली आहे. मागील 5 वर्षांपासून राजकीय क्षेत्रात नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या चारही पक्षांची स्थिती एकसारखी झाली आहे. आपल्या स्वार्थापोटी राजकीय खेळी करून पक्ष फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. दुसऱ्या पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या फळी मोडून काढून जमेल त्या मार्गाने आपल्या पक्ष बळकट करायचा मनसुबा ठेवून राजकारण सुरू आहे.
पक्ष वाढीसाठी मागील कित्येक वर्षांपासून सेवा देणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. पक्षांमध्ये आयाराम गयारामांचे खेळ सुरू झाल्याने राजकीय वातावरण पार बिघडले आहे. आपल्या पक्षाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी निष्ठावान कार्यकर्ते निवडणुकीत घरोघरी मतदान चिठ्ठया पोहोचवीत होते. त्यामुळे आपल्याच लोकांचा अविश्वास त्यांच्या जिव्हारी लागला आहे. याचा परिणाम येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भोगावा लागणार, हे निश्चित.