प्रशासन

Nutritional Diet : बुरशीजन्य आहारामुळे प्रशासन हादरले

Bhandara : अधिकाऱ्यांकडून तात्काळ दखल; बचत गटावर कारवाई

Action : अंगणवाडीतील चिमुकल्यांना बुरशीजन्य, सोंडे व अळ्या लागलेला आहार दिला जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर शहरातील मुक्ताई अंगणवाडीतील हा प्रकार बघून प्रशासनही हादरले. चिमुकल्या विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा आहार पुरवठा केला जात आहे. गरम व ताज्या आहाराच्या नावावर शिळे, बुरशीजन्य, जाळे लागलेले अन्न देण्यात येत आहे. याची अत्यंत गंभीर दखल घेण्यात आली. जिल्हा बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करीत बचत गटाला पुरवठा बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

महिला बचत गटाच्या माध्यमातून निकृष्ट दर्जाच्या आहार पुरवठा करण्यात येत असल्याचे दोन दिवसांपूर्वी उघडकीस आले. स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित मेश्राम यांनी हे प्रकरण उघडकीस आणले. त्यासंदर्भातील महिती अंगणवाडी सेविकेनेच दिली होती. याची गंभीर दखल घेत जिल्हा बालविकास प्रकल्प अधिकारी तुषार पौनीकर यांनी संबंधित महिला बचत गटाला आहार पुरवठा बंद करण्याचे आदेश मंगळवारी (दि. 24 सप्टेंबर) रोजी दिले.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना नागरी प्रकल्प अंतर्गत मुक्ताबाई अंगणवाडी केंद्र चालविले जाते. शासनाच्या नियमानुसार या केंद्रातील विद्यार्थ्यांना गरम व ताजे पोषण आहार देण्याचे निर्देश बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी भंडारा यांनी दिले होते. परंतु सदर गरम व ताज्या पोषण आहाराच्या नावावर शिळे, बुरशी व जाळे असलेले तसेच कीटक आढळून आलेले अन्न बालकांना देण्यात येत होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली.

Bhandara : पोषण आहारात सोंडे आणि अळ्या!

अनेकदा तक्रार, पण दखलच नाही

अंगणवाडी सेविका बबिता सारंगपुरे यांनी याबाबत नगर परिषदेच्या सहाय्यक प्रकल्प अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे यापूर्वी अनेकदा तक्रार केली होती. पोषण आहारात सोंडे, कीटक आढळून आल्यामुळे पालकांचाही संताप वाढला होता. पण तक्रारींची दखलच घेण्यात आली नाही.

चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात

मुक्ताबाई अंगणवाडी केंद्रात कीटक, बुरशीजन्य आहारामुळे बालकांच्या जीवाला निश्चितच धोका निर्माण झाला होता. लहान मुलांच्या जीवाशी येथे खेळ सुरू होता. याची तक्रार केल्यानंतर जिल्हा बालविकास प्रकल्प अधिकारी तुषार पवनीकर यांनी गंभीर दखल घेतली. पुरवठा आदेशाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आहार पुरवठा बंद करण्याचे आदेश बचत गटाला देण्यात आले.

error: Content is protected !!