महाराष्ट्र

Pooja Chavan suicide case : न्यायालयाला राजकारणात का ओढता?

High Court : चित्रा वाघ यांना न्यायालयाने फटकारले; बदललेल्या भूमिकेवरून व्यक्त केली नाराजी

Bombay High Court : काही वर्षांपूर्वी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चांगलेच गाजले. या प्रकरणात मंत्री संजय राठोड दोषी असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. तेव्हा चित्रा वाघ यांनी मंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दरम्यान भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी याप्रकरणी कोर्टातही धाव घेतली होती. याप्रकरणी शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी चित्रा वाघ यांनी जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर आता चित्रा वाघ यांच्या बदललेल्या भूमिकेवरुन उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करीत फटकारले आहे.

बीड जिल्ह्यातील परळी या ठिकाणची रहिवाशी पूजा चव्हाण या तरुणीने 2021 मध्ये आत्महत्या केली होती. पुण्यातील महंमदवाडी येथील हिवन पार्क या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन तिने आयुष्य संपवले होते. आत्महत्या प्रकरणी माजी मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रान उठवले होते. राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीची सत्ता असताना चित्रा वाघ यांनी 2021 मध्ये एक जनहित याचिका दाखल केली होती. त्यावेळी संजय राठोड हे वनमंत्री होते. मात्र, या आत्महत्या प्रकरणाशी त्यांचे नाव जोडले गेल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी भाजपाकडून करण्यात आली. चित्रा वाघ यांनी एफआयआर नोंदवून विशेष तपास पथकाकडून याचा तपास करण्यात यावा, या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. एवढेच नव्हे तर, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणीही त्यांनी केली होती. दरम्यान काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी न्यायालयाने ही याचिका निकाली काढावी किंवा ती मागे घेण्याची मुभा द्यावी, अशी मागणी केली होती.

Raju Shetty : बांगलादेश सारखी वेळ आपल्यावर येऊ नये

राजकारणासाठी याचिकांचा वापर

याचिका मागे घेतल्यानंतरही पुन्हा न्यायालयात दाद मागण्याची मुभा द्यावी, अशी मागणी चित्रा वाघ यांच्या वकिलांनी केली. यावर सरन्यायाधीश डी. के. उपाध्याय यांनी चित्रा वाघ यांच्या वकिलाला फटकारले. ही याचिका आम्ही निकाली का काढायची? ही पद्धत नाही. सध्या तुमची विनंती काय आहे ते तुम्ही स्पष्ट करा. बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार तुमची भूमिका बदलते आणि राजकारण करण्यासाठी जनहित याचिकांचा माध्यम म्हणून वापर करून न्यायालयांना त्यात ओढले जात आहे. राजकारण करण्याचा हा मार्ग नाही आणि तो कधीही योग्य नाही, असे ताशेरे न्यायालयाने चित्रा वाघ यांच्यावर ओढले.

याचिका मागे घेणार नाही

न्यायालयाने फटकारल्यानंतर चित्रा वाघ बॅकफुटवर गेल्या. चित्रा वाघ यांनी याचिका मागे घेणार नसल्याचे स्पष्टीकरण वकिलामार्फत न्यायालयाला दिले. मात्र, वाघ यांची याचिका त्या दिवसासाठी चुकीच्या पद्धतीने सूचीबद्ध करण्यात आल्याचे त्यावेळी खंडपीठाच्या लक्षात आले. त्यामुळे खंडपीठाने ही याचिका बोर्डातून हटविण्याचे निर्देश दिले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!