या लेखात प्रकाशित झालेली मते लेखकाची आहे. या मताशी द लोकहित सहमत असेलच असे नाही.
BJP Vs Congress : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले सध्या चर्चेत आहेत. ज्या निष्ठावंत कार्यकर्त्यांने नानांचे चिखलाने माखलेले पाय धुतले त्यांनीच या विषयावरून सुरू असलेली आरोपांची ‘चिखलफेक’ ताबडतोब थांबवावी असे आवाहन केले आहे. नाना आपणांस वडिलांसारखे आहेत. दैवत आहेत. पाय धुण्यासाठी पायावर पाणी टाकले यात गैर काय? असा सवाल ही त्यांनी विचारला आहे. एवढं सारं होवून या विषयाचे गुऱ्हाळ थांबलेले नाही.
ज्याने नेत्याचे पाय धुतले त्याचाच काही आक्षेप नाही असे आता स्पष्ट झाले आहे. वास्तव समोर येऊनही भाजप आणि इतर सत्ताधारी पक्षांकडून नानांना लक्ष्य केले जात आहे.विरोधकांकडून त्यांच्यावर जमेल तसे टीकास्त्र सोडण्यात येत आहेत. नाना पटोले यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चा, महिला आघाडीच्यावतीने राज्यभरात काही ठिकाणी आंदोलन करण्यात आले. नानांचा निषेध नोंदविण्यात आला.
राजीनामा आणि बडतर्फी
कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेण्याच्या कृत्याबद्दल नानांनी माफी मागावी, अशी मागणी भाजप प्रवक्ते राम कदमांनी केली. नानांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप मुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांनी केली. आज पाय धुवून घेतले उद्या आंघोळ करून मागतील, अशी बोचरी टीका आमदार नितेश राणे यांनी केली आहे. दलित हितासाठी मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसच्या अध्यक्ष पदावर आल्याचा दावा केला जातो. त्यांनी शोषक मानसिकतेच्या नाना पटोले यांना बडतर्फ करावे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी केली आहे.
बदनाम करण्याचा डाव
लोकांचे पाय ‘ईडी’ कारवायांनी माखले आहेत. ते रात्रीच्या अंधारात काहींचे पाय धुतात. काहींचे पाय चेपून देतात, त्यांच्या बद्दलही काही बोलले पाहिजे. ते देखील दाखविले पाहिजे. पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. हा मला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा डाव आहे, असा स्पष्ट आरोप नानांनी केला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे अशा प्रकारे कारस्थाने करून आपली बदनामी सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
Congress News : होय धुतले मी पाय, आणखी धुणार; नाना माझे दैवत!
मी शेतकरी आहे. चिखलात फिरण्याची आपल्याला सवय आहे. मी वारकरीही आहे, असेही नानांनी नमूद केले. जो प्रकार घडला तो दिवसांच्या स्वच्छ प्रकाशात घडला. त्यात लपवण्यासारखे काहीच नाही. तरीही या घटनेचे व्हिडीओ दाखवून बदनामी केली जात आहे, असे नाना म्हणाले.
कार्यकर्ता निघाला निष्ठावंत
वाडेगांव येथे पाय धुण्यावरून सुरू झालेल्या प्रकारावर आरोपांची चिखलफेक सुरू आहे. वास्तव समोर येऊनही शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रकार अजूनही सुरूच आहे. कोणता मुद्दा किती ताणून धरायचा याचे भान कोणालाच नाही. टीका करायचा मुद्दा मिळाला की, पेटून उठायचे हा राजकारणी खेळ सध्या सुरू आहे. नानांचे पाय धुण्याचे चर्चेत आलेला कार्यकर्ता शेगांव तालुक्यातील कालखेड येथील रहिवासी आहे. नानांवर त्याची निष्ठा आहे. या भागात काँग्रेसचा कोणताही कार्यक्रम झाला तरी तो नानांच्या ताफ्यात आवर्जून दिसतो. या विषयावर कोणी राजकीय पोळी शेकू नये. आरोप करणे थांबवावे असे आवाहन विजय गुरव या नानांच्या चाहत्याने केले आहे.
कार्यकर्ताच जपला पाहिजे
एखाद्या नेत्याचे प्रचंड निष्ठावान कार्यकर्ते असू शकतात. असे कार्यकर्ते महाराष्ट्राने पाहिले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळ तर अशा कार्यकर्त्यांची फौजच होती. अलीकडेच लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या पराभव झाला. यामुळे त्यांच्या कार्यकर्त्याने स्वतःचे प्राण दिले. त्यानंतर आता एका निष्ठावान कार्यकर्त्यांने नाना पटोले यांचे पाय धुतले आहे. कार्यकर्त्यांना जपलं तर ते आपल्या नेत्यासाठी काहीही करू शकतात याची ही जिवंत उदाहरणे आहेत. या सर्वातून एकच म्हणावे लागेल, सच्चा कार्यकर्त्याच्या एकनिष्ठतेला जगात कुठेही तोड नाही.