महाराष्ट्र

Maharashtra Politics : बालभारतीतील ‘वन्स मोअर’वरून ‘शोर’

Balbharati : 'जंगलात ठरली मैफल' या कवितेवरून वाद

इयत्ता पहिलीच्या बालभारतीच्या पुस्तकात असलेल्या ‘जंगलात ठरली मैफल’ या कवितेवरून सध्या चांगलाच वाद निर्माण झाला आहे. या कवितेतील ‘वन्स मोअर वन्स मोअर झाला शोर’ या ओळींप्रमाणे खरेच ‘शोर’ होऊ लागला आहे. या कवितेचा समावेश करण्याच्या वादावरून राजकारण होत असल्याचेही बघायला मिळत आहे.

भारतीच्या पाठ्यपुस्तकांचा दर्जा, निवड समिती या साऱ्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. बालभारतीने देखील या वादावर आपली बाजू मांडली आहे. गेल्या सहा वर्षांत हा वाद निर्माण झाला नव्हता. पण आता वाद झाल्यानंतर पुन्हा यावर विचार करण्यात येईल असे बालभारतीने सांगितले आहे.

सध्या बालभारतीच्या इयत्ता पहिलीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील एका कवितेवर प्रचंड टीका होत आहे. ‘जंगलात ठरली मैफल’ असे या कवितेचे नाव असून, या कवितेमध्ये काही इंग्रजी शब्दांचा वापर करण्यात आल्यामुळे अनेक जण टीका करीत आहेत.

‘मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजेत’, या फेसबुक ग्रुपचे सदस्य संदीप जोशी यांनी या कवितेचे छायाचित्र पोस्ट केले आहे. पोस्टमध्ये ते म्हणतात, ‘हे आहे महाराष्ट्र शासनाचे बालभारतीचे इयत्ता पहिलीचे पुस्तक! कवितेच्या ओळीमध्ये लिहिलं आहे ‘वन्स मोअर वन्स मोअर झाला शोर’. किमान मराठी भाषा शिकवताना तरी मराठी शब्द वापरायला हवेत, असे वाटत नाही का? तुमचे मत काय?’

त्यांनी केलेल्या या पोस्टनंतर या कवितेचे छायाचित्र समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. एकूणच बालभारतीच्या पुस्तकांचा अभ्यासक्रम, त्यामध्ये निवडले जाणारे साहित्य आणि निवडसमिती आणि त्यातील हितसंबंध या अनुषंगाने लोक टीका करताना दिसत आहेत.

मराठीची केली ऐशी तैशी !

या अस्वल, हत्ती, कोल्हा, वाघ, लांडगा, मुंगी, ससा, अशा प्राण्यांचा उल्लेख आहे. पण, या कवितेत काही हिंदी आणि इंग्रजी शब्दांचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये बात, शोर असे हिंदी शब्द, तर माऊस, वन्समोअर अशा इंग्रजी शब्दांचा वापर झालाय. त्यामुळे या कवितेवर आक्षेप घेतला जातोय. ही कविता कोणत्या निकषांवर बालभारतीच्या पुस्तकात निवडण्यात आली? असा सवाल सोशल मीडियावरून विचारला जात असून मराठी भाषेची बालभारतीनेच ऐशी तैशी केल्याचा सूर उमटत आहे.

त्यात वाईट काय?

दुसऱ्या बाजूला काहींनी कवितेतील शब्दांचे समर्थनही केले आहे. कौस्तुभ खांडेकर यांनी ‘इयत्ता पहिलीच्या बालभारतीच्या कवितेवरून एवढा कांगावा करण्यासारखं नक्की काय आहे?’ असा सवाल केला आहे. ‘वन्स मोअर, वन्स मोअर’ हे शब्द सर्रास कुठल्याही कार्यक्रमात बोलले जातात. जी भावना तिथे दाखवायची आहे, त्याला वन्स मोअर या शब्दांऐवजी पर्यायी मराठी शब्द मला माहीत नाहीत. ‘शोर’ हा एकमेव शब्द अप्रस्तुत वाटू शकतो. पण तेवढं कवयित्रीनं घेतलेलं स्वातंत्र्य म्हणता येणार नाही का?’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ‘मराठी भाषा टिकवायची पद्धती आणि व्याकरणाचा आग्रह मराठी भाषेपासून मुलांना लांब नेतो आहेच, अजून किती नेणार?’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!