Attempt Of Checkmate : भंडारा जिल्ह्यात लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समिती वादात आहे. मुख्य कार्यालयात गेल्या काही दिवसांपासून सचिव कक्ष सील आहे. हा कक्ष उघडण्यासाठी सभापतींनी धडपड सुरू केली आहे. सचिवांच्या कक्षाचे कुलूप उघडण्यासाठी पोलिस तसेच लाखांदूर येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या कर्मचाऱ्यांना हजर राहण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिव कक्ष उघडणार की, सीलबंद राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संचालक मंडळ आणि सचिव यांच्यात गेल्या काही दिवसांपासून प्रशासकीय व आर्थिक व्यवहार वरून जुंपली आहे. या सर्वांमध्ये एकसूत्रता नसल्याने सभापतींनी तातडीची सभा बोलावली. त्यानंतर त्यांनी चक्क सचिवांच्या कक्षाला कुलूप लावले. त्याच दिवशी सचिवांकडील प्रशासकीय तसेच आर्थिक व्यवहाराचा पदभार काढण्यात आला. सचिव, सभापती तसेच संचालक प्रमोद प्रधान यांच्यात विविध विषयांवरून भंडाऱ्याच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयात तक्रारनाट्य रंगले. या तक्रारींची चौकशी करण्यासाठी अद्यापही मुहूर्त सापडलेला नाही. त्यामुळे सभापती, संचालक आणि सचिव वाद कायम आहे.
नेमके काय होणार?
सभापती, सचिव यांच्यातील वादाचे कोलीत विरोधी संचालकांच्या हाती लागले. त्यामुळे त्यांनी साचिवाच्या कक्षाला लावलेले सील उघडण्यासाठी पोलिसांना बोलाविले. मात्र कोणतेही लेखी आदेश नव्हते. सहाय्यक निबंधक सहकारी संस्थांचा कर्मचारी देखील हजर नव्हता. त्यामुळे सील उघडता आले नाही. आता मात्र लाखांदूरच्या सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेला पत्रातून कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आली आहे. त्यामळे सचिवांच्या कक्षाला लावण्यात आलेले सील उघडण्याचा मुहूर्त ठरला आहे. ठरलेल्या मुहूर्तावर सचिवांच्या कक्षाचे सील उघडणार की पुन्हा मुहूर्त हुकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कार्यवाही होणार
जिल्हा उपनिबंधकांकडील तक्रारीचे निराकरण होण्यापूर्वीच कुलूप उघडण्याची कार्यवाही होणार आहे. यासंदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींनी सभा घेतली होती. काही संचालक मिळून 14 ऑगस्ट रोजी सचिवांच्या कक्षाला कुलूप लावले होते. दीड महिन्याचा काळ लोटल्यानंतरही यावर तोडगा निघालेला नाही. भंडाऱ्याचे जिल्हा उपनिबंधक आणि लाखांदूरचे सहाय्यक्त निबंधक सहकारी संस्था यांच्याकडील तक्रारीचे निराकरण झालेले नाही. अशात सील उघडण्याविषयीही संभ्रम आहे. त्याबाबतही आदेश प्राप्त झालेले नाही. मात्र संचालकांनी सील उघडण्याची हालचाल सुरू केल्याने सभापती आणि सचिव यांच्यातील वादाचे काय होणार, असा प्रश्न आहे.