Political News : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक प्रक्रिया आता पूर्णपणे सुरू झाली आहे. बुधवारी (ता. 20) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात सुरुवात झाली आहे. प्रशासनाचे त्यादृष्टीने काम सुरू केले असले तरी या मतदारसंघातील एकाही राजकीय पक्षाने अद्याप उमेदवाराच्या नावाची घोषण केलेली नाही. त्यामुळे नामांकन स्वीकारण्यासाठी ‘काऊंटर’वर बसलेल्या अधिकाऱ्यांना पहिल्या दिवशी उमेदवारी अर्जाची दीर्घ प्रतीक्षा करावी लागली.
नामांकन भरण्याचा बुधवारी पहिला दिवस होता. मात्र पहिल्या दिवसाचा मुहूर्त कुणालाही साधला नाही. पहिल्याच दिवशी 79 उमेदवारी अर्जांची विक्री मात्र झाली. यात नेमक्या किती व्यक्तींनी नामांकन खरेदी केले याची माहिती प्रशासनाकडून मिळू शकली नाही. नामांकन अर्ज सादर करण्याची अखेरची तारीख 27 मार्च आहे. त्यापूर्वी सर्वच पक्षांना उमेदवार निवडीचा ‘सस्पेन्स’ संपवावा लागणार आहे.
काँग्रेस-भाजप गप्प
भाजपा आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्ये उमेदवारच्या निवडीसाठी प्रतीक्षा आहे. भाजपामध्ये प्रचंड चढाओढ आहे, तर काँग्रेसमध्ये ‘पहिले आप, पहिले आप’ असे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) या मतदारसंघासह अन्य चार लोकसभा मतदारसंघांवर दावा केला आहे. त्यातल्या त्यात खासदार प्रफुल्ल पटेल स्वतः येथील उमेदवारीसाठी आग्रही आहेत. त्यामुळे आता भाजपच्या (BJP) उमेदवाराचे तिकीट दिल्लीवरूनच निश्चित होणार असल्याचे सांगितले जात आहे. भाजपच्या उमदेवाराच्या नावाची निश्चिती जरी दिल्लीत होणार असली तरी त्याला नागपुरातील गल्लीची मोहोर लागणे तितकेच गरजेचे राहणार आहे. या सर्व घडामोडीत काँग्रेसमध्ये मात्र शांततेचे वातावरण आहे.
काँग्रेसमध्ये उमेदवारी कोणाला मिळणार हे नक्की नाही. समेटातूनच येथे उमेदवारी दिली जाण्याची शक्यता अधिक आहे. जातीय समिकरणावर लक्ष ठेवत येथे ऐनवेळी नवीनच नाव पुढे येण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. अखेरच्या क्षणी आयात केलेला उमेदवारही काँग्रेसचा ‘एबी फॉर्म’ आपल्या नामांकनाला जोडू शकतो, अशीही शक्यता आहे. या सर्व घडामोडीत जिल्हा प्रशासन उमेदवारांचे नामांकन अर्ज स्वीकारण्यासाठी मात्र ‘पलके बिछाए’ बसले आहेत.