Election Campaign : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मतदार राजाला सुगीचे दिवस आले आहे.दरम्यान सर्वच उमेदवार थेट मतदाराशी संपर्क साधत आपली बाजू मतदारांसमोर ठेवत आहेत. तर सोशल मिडीयाच्या माध्यमातून हायटेक प्रचार सुरू आहे. त्यातच आता उमेदवारांचे सोशल मिडीया टिम मतदारांना मोबाईलवर संपर्क साधून प्रचारसभांना उपस्थित राहण्याची विनंती करीत आहेत. यामुळे प्रचाराचा धुराळा उडाला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे तर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे दोघेही आमने सामने आहेत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या निवडणूक प्रचारार्थ आतापर्यंत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रचारसभा झाली. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची सभा होणार आहे, तर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते मुकुल वासनिक, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रचारसभा झाल्या आहेत, तर 13 एप्रिलला काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा होणार आहे.
यासाठी रिंगणातील उमेदवार प्रचार अभियानात व्यस्त आहेत. सर्वच पर्यांचा अवलंब करून प्रत्येक मतदारांपर्यत पोहोचण्याचे आवाहन उमेदवारासमोर आहे. यासाठी उमेदवारांनी उभारलेली यंत्रणा कामाला लागली आहे. आपआपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी बडे नेते जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या सभांना गर्दी दिसावी म्हणून कार्यकर्ते व समर्थकांची लगबग दिसत आहे. अशात आता उमेदवारांचे सोशल मिडीया टिम मतदारांना मोबाईलवर संपर्क साधून प्रचारसभांना उपस्थित राहण्याची विनंती करीत आहेत. आमच्या उमेदवारांची अमुक ठिकाणी सभा आयोजित आहे. त्या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचे आहे, असे सांगितले जाते.