Political News : लोकशाहीचा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता. 19) मतदान पार पडले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिग्गज नेत्यांनी मतदान करीत आपापल्या पक्षाला विजय मिळेल असा दावा व्यक्त केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात मतदानाचा हक्क बजावला.
आरएसएस प्रमुखांचे मतदान
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. महाल परिसरातील आदितवार दरवाजा प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर डॉ. भागवत यांनी सकाळी लवकर मतदान केले. यावेळी त्यांनी प्रत्येकाने आपले मतदान करावे असे आवाहन केले. मतदान करणे ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे 100 टक्के मतदान होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर या मतदार संघांसाठी शुक्रवारी मतदान पार पडले.
गडकरी पोहोचले सहपरिवार
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या परिवारासह टाऊन हॉल येथील मतदान केंद्रावर मतदान केले. कांचन गडकरी यावेळी त्यांच्या समवेत होत्या. मतदान केल्यानंतर गडकरींच्या चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास दिसत होता. गडकरी तिसऱ्यांदा नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आपल्याला मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळेल असा विश्वासही गडकरी यांनी यापेळी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. नागपुरात नितीन गडकरी आणि काँग्रेसचे उमेदवार आमदार विकास ठाकरे यांच्यात थेट लढत आहे.
आईचा हाथ, पत्नीची साथ
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्नी आणि आईसमवेत मतदान केले. फडणवीस आपल्या वृद्ध आईचा हात धरून त्यांना मतदान केंद्राकडे नेले. यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसही होत्या. जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजयी करण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे यंदाही नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
ठाकरे कार्पोरेशन शाळेत
काँग्रेसचे उमेदवार तथा आमदार विकास ठाकरे यांनी नागपुरातील सुभाष नगर भागात असलेल्या कार्पोरेशन शाळेत मतदान केले. नरेंद्र मोदी यांच्या जुमलेबाजीला लोक आता कंटाळले आहेत. त्यामुळे यंदा मतदार त्यांना नक्कीच धडा शिकवतील असा विश्वास ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. मतदारांना यंदाच्या निवडणुकीत जुमलेबाजांना उखडून फेकण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे. त्याचा ते पूर्णपणे फायदा घेतील असे आमदार ठाकरे यावेळी म्हणाले.
बावनकुळेंचा विश्वास
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीच्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त केला. बावनकुळे यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघात असलेल्या कोराडी ग्रामपंचायत परिसरातील केंद्रात मतदान केले. यानंतर बावनकुळे म्हणाले की, जनतेने महायुतीला विजयी करण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे विदर्भातील सर्व जागांवर महायुतीला विजय मिळेल. माजी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी नागपूर शहरातील डिग दवाखान्याजवळ असलेल्या मनपा प्राथमिक शाळेत मतदान केले.
वडेट्टीवार चंद्रपुरात
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपुरात मतदान केले. ब्रह्मपुरीतील देलनवाडी वॉर्डात असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत त्यांनी मत दिले. देशात नरेंद्र मोदी यांनी अराजकता पसरविली आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी नाव आता लोकांना नको आहे. त्याची सुरुवात झाली आहे. जातीयवादी शक्तींना आता उतरती कळा लागली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदान काँग्रेसला साथ देतील असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी मतदान केल्यानंतर व्यक्त केला.
पारवे कुटुंबासह उमरेडात
शिवसेनेचे रामटेक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजू पारवे यांनी परिवारासह उमरेडमध्ये मतदान केले. त्यांचे नाव परसोडी येथील पंडित नेहरू उच्च प्राथमिक शाळेतील मतदार यादीत होते. मतदारांना विकास करणारे सरकार हवे आहे. त्यामुळे विदर्भातील मतदानाच्या टक्केवारीचे सर्व विक्रम यंदा मोडीत निघतील. आपल्याला रामटेक लोकसभा मतदारसंघातील नागरिक नक्कीच कौल देतील असा विश्वास पारवे यांनी यावेळी व्यक्त केला.
देशमुखांना परिवर्तन अपेक्षित
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्नी व मुलगा सलील देशमुख यांच्यासह नरखेड तालुक्यात असलेल्या वडविहिरा येथे मतदान केले. देशात परिवर्तनाची नांदी दिसत आहे. यंत्रणांच्या बळावर लोकशाहीशी खेळ करणाऱ्यांना यंदा मतदार धडा शिकवितील असे अनिल देशमुख मतदानानंतर म्हणाले. राज्यात महाविकास आघाडीची शक्ती वाढली आहे. विदर्भाने नेहमीच अशा पक्षांना साथ दिली आहे जे धर्मनिरीपेक्ष आहेत. यंदाही निवडणुकीत असे परिवर्तन बघायला मिळेल असे देशमुख म्हणाले.
कवाडे म्हणाले, विजय आमचाच
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी लक्ष्मी नगरातील पितळे शास्त्री शाळेत पत्नीसह मतदान केले. पूर्व विदर्भात येणाऱ्या नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा-गोंदिया या पाचही मतदारसंघात महायुती उमेदवार मोठ्या मतधिक्क्याने जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मोदी यांच्या कामाची दखल आज पूर्व विदर्भातील जागरूक मतदारांनी घेतली आहे. नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी विदर्भातील पाचही मतदार संघातून महायुतीचा विजय निश्चित असल्याचे ते म्हणाले.