संपादकीय

Maharashtra Politics : वाचाळवीरांना वेळीच आवरा

Assembly Election : राजकारणात व्देषाला थारा नकोच

या लेखात प्रकाशित मते ही लेखकांची आहे. द लोकहित त्याच्याशी सहमत असेलच असे नाही.

Criticism : सध्याचे राजकारण भरकटत चालले आहे. सारेच सत्तेच्या मागे धावताना दिसतात. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात समन्वय आणि सामंजस्याची भूमिका दिसत नाही. राजकीय पक्षात विचार, भूमिका याबाबतीत मतभेद असू शकतात. आता वेगळेच चित्र बघावयास मिळते. मतभेदांची जागा वैमनस्याने घेतली आहे, राजकारण वैर आणि व्देषाने पछाडले आहे. नेते मंडळींच्या बोलण्याला मर्यादा राहिलेली नाही. वाचाळवीर वाढत आहेत. बेताल वक्तव्ये केली जात आहेत. वेगळ्याच प्रकारचे शाब्दिक युद्ध सुरू आहे.राजकारण हे समाजकारण करण्यासाठी असते. याचे भान लोकप्रतिनिधी विसरत चालले आहेत. 

जनतेच्या समस्या जाणून घेऊन, त्या सोडवण्यासाठी आपल्याला जनतेने निवडून दिले, याचा विसर लोकप्रतिनिधींना पडला आहे. एखादा प्रश्न सोडविण्यासाठी सामंजस्याची भूमिका न घेता तो कसा ताणला जाईल, अशी भूमिका काही जण घेताना दिसतात.

छत्रपती शिवाजी महाराजांवरून राजकारण

प्रत्येक बाबतीत राजकारण खेळले जात आहे. रायगड (Raigrah) किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. तिथे ठाकरे आणि राणे समर्थकांत बाचाबाची झाली. त्वेषाच्या शाब्दिक फैरी झडल्या. तिथे जो प्रकार घडला तो लाजीरवाणा म्हणावा लागेल. घटनेचे गांभीर्य कुणाला नव्हते. सर्वांच्या डोक्यात राजकारण घुसले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी या ठिकाणी वापरलेली भाषा अशोभनीय होती. पत्रकारांशी केलेले वर्तन निषेधार्ह होते. राजकारणाचे किती अवमूल्यन होत आहे, हेच यावरून दिसून येते.

बोचऱ्या शब्दांचा वापर

वादग्रस्त वक्तव्ये करण्यात काही नेते मंडळी, लोकप्रतिनिधी आघाडीवर आहेत. ही मंडळी बोलताना कुठलीच मर्यादा पाळत नाहीत. मनात येईल ते बडबडत असतात. त्यांच्या या बाष्फळ बडबडीमुळे वातावरण तापते. सत्ताधाऱ्यांविषयीचा मनात खदखदणारा व्देष आणि मत्सर या बोलण्यातून पाझरत असतो.

अशी त्वेषाची भाषा बोलण्यात विश्वप्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) आघाडीवर आहेत. ते सर्वोच्च पदावर असणाऱ्याया व्यक्तीवर पातळी सोडून टिका करतात. आता तर ते राष्ट्रपतींनी काय बोलावे, असे सल्ले देत आहेत. उद्धव ठाकरे यांनी तर सत्ताधाऱ्यांवर जमेल तसे आसूड ओढण्याचा वसाच घेतला आहे. गद्दार, खोकेबाज, गुजरातचे व्यापारी, अहमदशहा अब्दाली असे अफलातून शब्दप्रयोग ते करीत असतात.महायुतीला राज्यातून हद्दपार करण्याचा विडाच त्यांनी उचलला आहे.

Devendra Fadnavis : पटोले, ठाकरे, केदारांचे जवळचे कोर्टात गेले

आपल्या अधिकार कक्षेत न येणाऱ्या विषयावर काही मंडळी बिनधास्त मतप्रदर्शन करताना दिसतात. अकोल्याचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) हे अशाच प्रकारचे एक टीआरपी प्रेमी दिसतात. त्यांना जगातल्या कोणत्याही विषयावर बोलण्याचा जणू परवानाच अजित पवारांनी दिला आहे, असे ते वांगतात. अजित पवार महायुतीचा धर्म पाळतात. भाजपचे नेतेही महायुती जपत आहेत. काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी अजितदादांना काळे झेंडे दाखविले. भाजपने त्यांना तत्काळ कडक शब्दात समज दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कार्यकर्त्यांना सुनावले. पण मिटकरी गेल्या काही दिवसांपासून ज्या ज्या लोकांवर बोलत आहेत, त्यावरून त्यांना दादांना बाजूला करून सर्वसेवाधिकारी तर व्हायचे नाही ना? असा प्रश्न पडतो. त्यांच्या बोलण्याची, आंदोलनांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फारशी कोणी गंभीर दखल घेत नाही, असे अलीकडच्या काही घटनाक्रमावरून वाटते.

आमदारांचा नेम नाही

बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) हे देखील काय बोलतील याचा नेम नसतो. वाघाच्या दातावरून त्यांनी काय बोलावे आणि काय बोलू नये याचा धडा घेतलेला दिसत नाही. कोविडचे किड एखाद्या नेत्याच्या तोंडात सोडण्याची भाषाही प्रसंगी करून गेले. त्यामुळे गायकवाड यांनाही सबुरीने घेण्याचा सल्ला शिवसेनेकडून गरजेचा झाला आहे. अशाच वाचाळवीरतेतून अभिनेत्री तथा खासदार कंगना राणावत यांना पक्षश्रेष्ठींनी समज दिली. बेताल वक्तव्य टाळा, अशी ही समज होती. नेते कुठे काहीही बोलतात. पक्षश्रेष्ठींना उगाच सारवासारव करत बसावी लागते.

बडनेराचे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांचे लाडकी बहिण योजनेवरील वक्तव्य विरोधकांच्या हाती आयते मिळाले. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विधानाने वातावरण असेच तापले होते. त्यांनी इचलकरंजी मतदारसंघांची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत करून टाकली. कर्नाटकातील भाजपचे मंत्री संजय पाटील यांनी राज्यातील महिला मंत्र्यांना उद्देशून केलेल्या विधानाने गदारोळ उडाला. बोलताना कुठलेही नीतीनियम न पाळणाऱ्या नेते मंडळींना पक्षश्रेष्ठी समज देतात. पण त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते.

भाजपकडून धडा

अलिकडेच भाजपध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी पक्षाच्या बैठकीत खासदारांना काही सूचना केल्या. नेते मंडळी कशाला जुमानत नाहीत. चांगल्या सूचनांकडे कानाडोळा करतात. प्रत्येक बाबतीत राजकारण करण्याच्या भूमिकेत ते असतात. वातावरण कसे तापत राहिल हे ते पाहतात. आपली राजकीय पोळी कशी शेकता येईल, अशा अविचाराने ते पछाडलेले दिसतात. आपल्या बेताल वक्तव्याने, वागण्याने समाजात दुही निर्माण होते. लोकांची मने कलुषित होतात. वातावरण बिघडते यांचे भान त्यांना नसते. खासगी वाहिन्यांवर आयोजित वादविवाद, चर्चा या कार्यक्रमात भडक बोलण्यावरून असाच वादंग होतो.

दोन वर्षांपूर्वी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या बाबतीत मार्गदर्शक सूचना केली होती. कार्यक्रमाचा दर्जा तसेच सामाजिक भान राखले जावे , अशा त्या सूचना होत्या. अशा कार्यक्रमांमध्ये असांसदीय भाषेचा वापर होऊ नये, असे सांगितले होते. प्रसारमाध्यमांकडून अशा अपेक्षा बाळगत असतानाच नेते म़डळींच्या जिभेला आवर घालण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. आपल्या राजकीय सोयीसाठी अशा बेताल लोकांना पाठीशी घालणे केव्हाही चुकीचे ठरते. आपल्या बोलण्यातून अनर्थ निर्माण होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घेणे आवश्यक ठरते. बोललेले शब्द आणि सुटलेला बाण वापस घेता येत नाही. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असावे. मतभेद असावे, पण मनभेद असता कामा नये. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी आपली जबाबदारी ओळखून वागायला हवे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!