Mahavikas Aghadi : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची रविवारी (ता. 18) नागपुरात भेट झाली. राऊत बराच वेळेपर्यंत देशमुख यांच्या निवासस्थानी होते. दोन्ही नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. त्यानंतर या भेटीमागे दडलेय काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना यांच्यातील सख्य जगजाहीर आहे. शरद पवार सध्या राज्यातील विविध भागांचा दौरा करीत आहेत. जेथे जेथे शरद पवार (Sharad Pawar) जात आहे, तेथे तेथे कदाचित योगायोगाने संजय राऊतही पोहोचत आहेत. दोन्ही नेते महाविकास आघाडीत असल्याने कदाचित हा योगायोग शक्यही आहे.
अशातच हा योगायोग पुन्हा विदर्भाच्या दौऱ्यात जुळून आला आहे. शरद पवार विदर्भाच्या दौऱ्यावर असतानाच संजय राऊत हे देखील नागनुरात ‘लॅन्ड’ झालेत. पवार वर्धेकडे रवाना झाल्यावर राऊत देशमुखांच्या घरी पोहोचले. देशमुख-राऊत जोडीने ईडी, सीबीआयच्या कारवाईवरून अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली. दोन्ही नेत्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना तुरुंगातील दिवस किती अवघड होते, हे सांगितले. त्यामुळे विदर्भात भाजपची घोडदौड रोखण्यासाठी आगामी काळात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे काम करतील असे दिसत आहेत.
काँग्रेसपेक्षा जास्त जवळीक
महाविकास आघाडीचा विचार केल्यास शिवसेनेची काँग्रेसपेक्षा (Congress) राष्ट्रवादी काँग्रेसशी जास्त जवळीक आहे. महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री करण्यात संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मोलाची भूमिका राहिल्याचे मानले जाते. त्यामुळेच सगळे विरोधात असतानी ठाकरे यांनी राऊत यांच्याशी असलेली ‘दोस्ती तुटायची नाय..’ असे साऱ्यांना दाखवून दिले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला ‘ओव्हरटेक’ केले. अभेद्य गड असलेल्या विदर्भात काँग्रेसने भजपवर कुरघोडी केली. त्यामुळे विदर्भ-मराठवाड्यात सध्या महाविकास आघाडी भाजपला हरविण्यासाठी चांगलीच मशागत करीत आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसनेही विदर्भावर लक्ष केंद्रीत केले आहे.
महाविकास आघाडीची सत्ता आल्यास उद्धव ठाकरे हे मुख्यमँत्री होतील असे शिवसेनेकडून वारंवार सांगण्यात येते. परंतु काँग्रेसचा याला विरोध दिसत आहे. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदाचे अनेक दावेदार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांची प्रतिष्ठा लोकसभा निवडणुकीच्या निकालात यश मिळाल्याने वाढली आहे. ‘हायकमांड’ नानांना झुकते माप देत आहे. पटोले हे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार आहेत. याशिवाय पृथ्वीराज चव्हाण यांनाही मुख्यमंत्रिपदी कामाचा अनुभव आहे. विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनाही मुख्यमंत्रिपद मिळावे ही अपेक्षा आहे. त्यामुळे काँग्रेस पुन्हा ठाकरेंना मुख्यमंत्री करेल असे चित्र सध्यातरी नाही.
महाविकास आघाडीत सहाजिकच काँग्रेस जास्त जागा लढवेल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ज्या पक्षाच्या जास्त जागा, त्याचा मुख्यमंत्री असे सूत्र ठरणार आहे. काँग्रेसचा मुख्यमंत्री झाल्यास ही बाब राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना दोघांसाठीही अडचणीची ठरू शकते. त्यामुळे मनातून दोन्ही पक्षांना काँग्रेसचा मुख्यमंत्री नको आहेत. त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची जवळीक वाढत असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री कोण होणार, यावर सध्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार दोघेही मौन आहेत. परंतु योग्य वेळ आल्यानंतर पवार ठाकरे यांचे नाव पुढे करू शकतात, असे सांगितले जात आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये भेटीगाठीतून व्यूहरचना तयार केली जात आहे. अशात निवडणुकीनंतर यश मिळाल्यास शिवसेना, राष्ट्रवादी दडवून ठेवलेले पत्ते वर काढू शकतात, असे बोलले जात आहे.