महाराष्ट्र

Assembly Election : मतदारांना घराबाहेर काढण्याची धडपड

Maharashtra Politics : टक्केवारी वाढविण्यासाठी सकाळपासूनच लगबग

Parties In Tension : लोकसभा निवडणुकीत मतदानाची कमी झालेली टक्केवारी सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे. विदर्भातील पारंपरिक मतदार लोकसभा निवडणुकीत बाहेर न निघाल्यानं खास करून भाजपची धावपळ झाली होती. मात्र यंदा ही चूक भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी टाळली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (20 नोव्हेंबर) मतदानाला सुरुवात झाल्यापासून राजकीय कार्यकर्त्यांची धावपळ सुरू असल्याचं दिसलं.

आपापले मतदार घरातून बाहेर काढत बुथपर्यंत पाठविण्यासाठी यंदा सर्वच पक्षांनी कार्यकर्त्यांची फौज कामाला लावली होती. ज्येष्ठ मतदारांसाठी ’व्होट फ्रोम होम’ची व्यवस्था निवडणूक आयोगानं केली आहे. त्यामुळं त्यांना नेण्याचा व आणून सोडण्याचा कार्यकर्त्यांचा त्रास वाचला आहे. परगावी राहणाऱ्या मतदारांना आणण्यासाठी अनेक राजकीय पक्षांनी व्यवस्था केली होती. खासगी लक्झरी बस, ऑटोचे भाडे मतदारांना देण्यात आले.

कारची व्यवस्था

नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, पुणे आदी भागात राहणाऱ्या विदर्भातील मतदारांसाठी रेल्वेचे बुकिंगही करण्यात आलं होतं. याशिवाय खासगी वाहनांची व्यवस्थाही करण्यात आली होती. हे सर्व मतदार मंगळवारी (19 नोव्हेंबर) सायंकाळपर्यंत आपापल्या मतदारसंघांमध्ये पोहोचतील अशी व्यवस्था करण्यात आली होती. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी कार्यकर्ते विदर्भातील सर्वच गावं, शहरांमधील गल्ल्यांमध्ये फिरत होते. प्रत्येक घरात जावून मतदान झालं किंवा नाही याची खात्री करीत होते.

Assembly Election : भागवत म्हणाले, ‘राजकारणावर नंतर कधी बोलू’

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ‘कटेंगे तो बटेंगे’ आणि ’एक है तो सेफ है’ असे दोन नारे दिले आहेत. काँग्रेसनं संविधान बचावच्या मुद्द्यारवर प्रचार केला. वंचित बहुजन आघाडीनं आरक्षण बचावसाठी काम केलं. परिवर्तन महाशक्तीनं श्रमिक आणि रोजगाराचा मुद्दा पुढं केला. परंतु यंदा निवडणूक प्रचार जवळपास जात, धर्म, पंथ, आरक्षण याच मुद्द्यांभोवती घुटमळताना दिसला. कोणी महिलांना 2 हजार 100 रुपयांचं वचन दिलं तर कुणी तीन हजार रुपयांचं. त्यामुळं निवडणुकीत विकासाचं ब्ल्यू प्रिंट कोणत्याच पक्षानं सादर केलं नाही.

प्रचाराच्या रणधुमाळीत काही मतदारसंघांमध्ये नेत्यांवर हल्ल्याच्या घटना घडल्या. मोठ्या प्रमाणावर रोख रक्कमही पकडली गेली. महायुतीनं महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याचा पूर्ण प्रयत्न केला. आघाडीनंही आरोप करताना कोणतीही कसर सोडली नाही. दोन्ही कडील नेत्यांनी आणि पक्षांनी एकमेकांविरुद्ध भरपूर तक्रारीही केल्या. जोरदार शक्ती प्रदर्शनही करण्यात आलं. यानंतर आता सर्वच उमेदवारांच्या भाग्याचा फैसला ईव्हीएममध्ये सीलबंद झाला आहे. मतदारांनी कोणाला कौल दिला, हे 23 नोव्हेंबरचा सूर्य स्पष्टकरणार आहे. त्यामुळे आता 48 तास उमेदवारांचा जीव टांगणीला लागून राहणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!