महाराष्ट्र

Youth Congress : आमदार गायकवाडांच्या विरोधातील आंदोलनात तणाव

Buldhana : युवक काँग्रेसचे आंदोलन पोलिसांनी रोखले; आजी-माजी आमदार ताब्यात

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले. त्यांच्या विधानाच्या विरोधात शुक्रवारी बुलढाण्यात युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्याची तयारी झाली. आमदार गायकवाड यांच्या कार्यालयाच्या जवळच आंदोलन सुरू करण्यात आले. आंदोलन सुरू होताच त्याच चौकामध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते जमायला लागले. त्यामुळे बुलढाणा पोलिसांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी जयस्तंभ चौकात काही काळ तणाव निर्माण झाला होता. ‘सरकार हमसे डरती है पोलीस को आगे करती है’, असे नारे देत काँग्रेसने पोलिसांचा निषेध व्यक्त केला.

युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवासन, राज्याचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसने आंदोलन केले. बुलढाण्यात मातोश्री कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेले जयस्तंभ चौकात युवक काँग्रेसने आंदोलन छेडले. आंदोलनाची तयारी सुरु असतानाच आमदार संजय गायकवाड यांच्या असंख्य समर्थकांकडून जयस्तंभ चौकात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मोठा तणाव निर्माण झाला होता.

याठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बीबी महामुनी, बुलढाणा उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील याच्या पथकाने आंदोलनकर्त्यांना आधीच ताब्यात घेतले. त्यामुळे पोलिसांनी आंदोलन दडपल्याचा आरोपही झाला.

Vanchit Bahujan Aghadi : सरकारी रुग्णालयात ‘खासगी’प्रमाणे दर?

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातही पोलिसांसोबत झटापट 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार गुरुवारी बुलढाण्यात होते. संत आणि महात्म्यांच्या स्मारकांचे व पुतळ्यांचे अनावरण करण्यात आले. याशिवाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमादरम्यान काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रक्ताने लिहिलेले पत्र मुख्यमंत्र्यांना द्यायचे आहे, असा पवित्रा घेतला. मुख्यमंत्र्यांच्या रोड शोमध्ये विघ्न आणले. यावेळी काँग्रेस पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. आजी-माजी आमदारांसह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना यावेळी पोलिसांनी ताब्यातही घेतले होते. शुक्रवारी पुन्हा युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह आमदार राजेश एकडे, आमदार धीरज लिंगाडे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी आंदोलनाला सुरुवात केली. पोलिसांनी हे आंदोलनही दडपले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!