गेल्या नऊ महिन्यांपासून शेतकऱ्यांना हक्काच्या पीकविम्याची रविकांत तुपकर लढा देत आहेत. आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्याचे काम करत आहेत. पण तरीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे गादी, उशी व बॅग घेऊन रविकांत तुपकर गुरुवारी बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात पोहोचले. त्याचठिकाणी ‘मुक्काम आंदोलन’ सुरू केले. अखेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
हक्काचा पीकविमा तत्काळ जमा करा म्हणत तुपकरांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. दरम्यान, रात्री नऊच्या सुमारास बुलढाणा शहर पोलिसांनी तुपकर यांना ताब्यात घेतले. त्यांना पोलीस ठाण्यात नेले. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणात तुपकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सरकारकडून वारंवार ‘तारीख पे तारीख’ देण्यात येत असल्याच्या धोरणाचा निषेध तुपकर यांनी केला. १५ सप्टेंबरपर्यंत पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असा शब्द कृषी सचिवांनी या आधी दिला होता. तो शब्द सरकारने पाळला नाही. त्यामुळे तुपकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला. शेतकऱ्यांनी नुकसान केल्याची तक्रार केल्यानंतर २५ दिवसांच्या आत पैसे देण्याचा नियम आहे. पण ९ महिने झाले तरी शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला नाही. मग कृषी विभाग काय करतो आहे? कंपनीवर कारवाई का करत नाही? असा सवाल रविकांत तुपकरांनी उपस्थित केला.
त्याचवेळी जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविम्याचे पैसे पडत नाहीत, तोपर्यंत आपण इथेच मुक्काम करणार आहोत, असेही ते म्हणाले. जिल्हा कृषी अधीक्षक मनोज ढगे यांच्या कार्यालयात अंथरूण आणि पांघरून सोबत घेऊन तुपकर यांनी मुक्काम सुरु केला होता. पोलिसांनी रविकांत तुपकर यांना रात्री नऊच्या सुमारास ताब्यात घेतले. जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाजवळ तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
Sudhir Mungantiwar : बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील गरिबांना हक्काचं घर
बंदूक ठेऊन आवाज दाबण्याचा प्रकार
तुपकर म्हणाले, ‘हा शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रकार आहे. कंपनीवर कारवाई करण्याचे सोडून आमच्यासारख्या चळवळीतील कार्यकर्त्यांवर कारवाई करता. आम्ही याला भीक घालणार नाही. महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरतील. आम्ही यांच्या दडपशाहीला जुमानणार नाही. पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. हे आंदोलन थांबणार नाही. जोपर्यंत पिक विमा मिळत नाही तोपर्यंत लढा सुरू राहील, असे रविकांत तुपकर म्हणाले.
शासकीय कामात अडथळा
तुपकर यांनी पिक विमा मिळावा तसेच विमा कंपनीवर ब्लॅक लिस्ट करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. या मागणीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात जाऊन कृषी अधीक्षक मनोज कुमार ढगे यांच्या दालनात विनापरवानगी मुक्काम आंदोलन केले. या प्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा बुलढाणा शहर पोलिसांनी तुपकर यांना ताब्यात घेतले होते. तक्रार दिल्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कलम 132 BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.