महाराष्ट्र

Assembly Election : विदर्भातील मतदारसंघात राहणार तगडा बंदोबस्त

Election Commission : संवेदनशील भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलिस तैनात

Security Arrangements : लवकरच विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर विदर्भातील अनेक मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणावर सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. अनेक जिल्ह्यातील पोलीस प्रमुखांनी निवडणूक काळात लागणाऱ्या बंदोबस्तासाठी आवश्यक ती माहिती निवडणूक आयोगाला कळवली आहे. त्यानुसार लवकरच राज्य आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या विदर्भात दाखल होणार आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये विदर्भातील काही भागांमध्ये जातीय तणाव आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. यासर्व मतदारसंघांची सविस्तर माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने मागवली होती. त्यानुसार सर्व जिल्हा पोलीस प्रमुखांनी आवश्यक ती सर्व माहिती निवडणूक आयोगाला दिली आहे. निवडणुकीपूर्वी ते मतदारसंघात करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईचा अहवाल देखील सादर करण्यात आला आहे. त्यानंतर आता निवडणूक आयोगाकडून अतिरिक्त मनुष्यबळ महाराष्ट्र पोलिसांना पुरविण्यात येणार आहे.

संवेदनशील ठिकाणी लक्ष 

विदर्भातील काही मतदारसंघांना आणि मतदार केंद्रांना संवेदनशील जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये अकोला पश्चिम मतदारसंघातील अनेक केंद्रांचा समावेश आहे. अकोला शहरात गेल्या दोन वर्षात जातीय तणावाच्या अनेक घटना घडल्या आहे. याशिवाय अकोट विधानसभा मतदारसंघातही गणेशोत्सवाच्या काळात तणाव आणि दगडफेकीची घटना घडली. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, मलकापूर, जळगाव जामोद या मतदारसंघातील बंदोबस्तही वाढवण्यात येणार आहे. अमरावती जिल्ह्यातील अमरावती शहर, बडनेरा, अचलपूर, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी येथे अतिरिक्त सशस्त्र पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे.

पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्हा माओवाद प्रभावित आहे. त्यामुळे या जिल्ह्यासाठी सुरक्षेचे उपाय वेगळ्या पद्धतीने करण्यात येत आहेत. गडचिरोलीमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंतच मतदान राहणार आहे. या भागात माओवाद्यांच्या हिंसक कारवाया हे मुख्य आव्हान पोलिसांपुढे आहे. तेलंगण आणि छत्तीसगड या दोन राज्यांची सीमा गडचिरोलीला लागून आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांच्या पोलीस बंदोबस्तही सीमावर्ती भागात राहणार आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये नक्षल कारवाया छुप्या पद्धतीनं डोकं वर काढतात. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील स्थानिक पोलिसांच्या मदतीला केंद्रीय पोलीस दल तैनात राहणार आहे.

नागपूर शहरातील काही मतदारसंघांमध्ये देखील अतिरिक्त पोलीस बळ तैनात करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाकडून सध्या केंद्रीय पोलीस बळ तैनातीसाठी आवश्यक ते आदेश काढण्यात येत आहेत. महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये एकाच वेळी विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे केंद्रीयस्तरावरून पोलीस मनुष्यबळ पाठवण्याचे काम आता सुरू करण्यात आले आहे. आयएएस अधिकाऱ्यांपैकी अनेकांना निरीक्षक म्हणून पाठवण्यात आले आहे. परराज्यातील आयपीएस अधिकारी पोलीस निरीक्षक म्हणून आले आहेत. त्यांच्या पाठोपाठ आता अतिरिक्त सशस्त्र पोलीस बल दाखल होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!